Shah Rukh Khan enters the billionaire club: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची १ ऑगस्ट २०२५ ला घोषणा करण्यात आली होती. २३ सप्टेंबर २०२५ ला या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.

अभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ या चित्रपटातून अभिनेत्याने पदार्पण केले होते. आता तब्बल ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. अभिनेत्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शाहरुख खान झाला अब्जाधीश

आता शाहरुख खान पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे, शाहरुख खानने अब्जाधीशांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. बॉलीवूड कलाकारांच्या हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार किंग खानची १२,४९० कोटी संपत्ती आहे. या यादीमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे. हुरुनने पहिल्यांदाच शाहरुखला अब्दाधीश म्हणून मान्यता दिली आहे.

शाहरुख खान फक्त अभिनयातून पैसे कमवतो असे नाही. तर त्याची निर्मिती संस्थादेखील आहे. अभिनेत्याच्या संपत्तीत सर्वात मोठा वाटा रेड चिलीज एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचा आहे. २००२ ला रेड चिलीज एंटरटेनमेंटची स्थापना करण्यात आली.

गेल्या दोन दशकांमध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंट या संस्थेने अनेक अशा चित्रपटांची निर्मिती केली, जे मोठ्या प्रमाणात गाजले. याबरोबरच, व्हीएफएक्स आणि डिजिटल उपक्रमांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या ही कंपनी ५०० हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात फायदेशीर उद्योगांपैकी एक म्हणून शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या संस्थेकडे पाहिले जाते. याबरोबरच, शाहरुख खान आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या क्रिकेट संघाचा सहमालक आहे.

शाहरुखनंतर या यादीमध्ये जुही चावला, हृतिक रोशन व अमिताभ बच्चन यांची नावे आहेत. शाहरुख खान आगामी काळात द किंग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिनेता अभिषेक बच्चनदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.