Shah Rukh Khan shares post for flood-affected residents in Punjab:पंजाबमधील सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान वेगवेगळ्या केंद्रीय संस्था राज्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काम करत आहेत.

काय म्हणाला शाहरुख खान?

आता अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पंजाबमधीस पुरग्रस्तासाठी चिंता व्यक्त केली आहे. त्याने लिहिले, “या विनाशकारी पुरामुळे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी मला वाईट वाटत आहे, मला दु:ख झाले आहे.”

पुढे त्याने लिहिले, “मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना यातून बाहेर पडण्याची ताकद मिळावी, अशी आशा करतो. देवाचा आशीर्वाद त्यांच्या कायम पाठीशी असू दे”, असे म्हणत त्याने पंजाबमधील नागरिकांबाबत चिंता व्यक्त केली.

बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये संजय दत्त, सनी देओल, शिल्पा शेट्टी, विकी कौशल, भूमी पेडणेकर, करीना कपूर खान आणि आलिया भट्ट या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.  आलियाने देणगीच्या लिंक्स शेअर केल्या. सोनू सूदने एक हेल्पलाइन सुरू केली आणि पूर्ण मदतीचे आश्वासन दिले. दिलजीत दोसांझने दहा गावे दत्तक घेतली आणि अ‍ॅमी विर्कने २०० घरे पुन्हा बांधण्याचे वचन दिले. याबरोबरच, सोनम बाजवा, गिप्पी ग्रेवाल, सतींदर सरताज आणि करण औजला यांनीदेखील मदतीचा हात पुढे केला आहे.

हिंदूस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, पंजाबमध्ये गेल्या ४० वर्षांतील सर्वात मोठ्या पूर आला आहे. १२ जिल्ह्यांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रावी, बियास आणि सतलजसह नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पठाणकोटमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे; तर होशियारपूर, अमृतसर, लुधियाना, मानसा, रूपनगर आणि बर्नाला येथे प्रत्येकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यान, सुमारे २.५६ लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे.दरम्यान, पीटीआयनुसार, जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनंतर आर्मी, बीएसएफ, भारतीय हवाई दल, एनडीआरएफ यांना राज्यात बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे.