बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान व चित्रपट निर्माता तरुण मनसुखानी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. असिस्टंट दिग्दर्शक म्हणून तरुणने शाहरुख खानसह ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘कभी अलविदा ना कहना’ यांसारख्या चित्रपटांदरम्यान काम केलं आहे. अशातच नुकतंच तरुण मनसुखानीने एका मुलाखतीमध्ये शाहरुख खानबद्द्लचा एक किस्सा सांगितला आहे.
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुख खानबद्दल बोलताना त्याच्यासह काम केलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत तरुण म्हणाला, “मी त्याला सेटवर खुर्च्या उचलाताना, पाऊस आल्यामुळे सेटीवरी टीमला मदत करताना पाहिलं आहे. गोष्टी सुरळीत व्हाव्या याकरिता तो असिस्टंट दिग्दर्शकाप्रमाणे काम करत असे. तो टीमबोरबर इतका मिळून मिसळून राहत असतो की तुम्हाला वाटणारच नाही तो शाहरुख खान आहे. तो नेहमी विनोद करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडून कायम काही न काही शिकायला मिळतं.”
तरुण पुढे म्हणाला, “शाहरुखकडून शिकायला मिळालेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी चित्रपटनिर्मितीबद्दल त्याच्याकडून शिकलो. ‘दोस्ताना’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी तो म्हणाला, तुझ्यासाठी दिग्दर्शन म्हणजे काय? दिग्दर्शन म्हणजे एक टक्के कॅमेऱ्याने शॉट घेणं आणि ९९ टक्के काम हे माणसांची व्यवस्थापना नीट करणं. असं त्याने मला सांगितलं त्याने शिकवलेली ही गोष्ट आजही माझ्या लक्षात राहिली आहे.”
शाहरुख खानबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो त्याच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘किंग’मध्ये शाहरुख खानसह अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, जयदीप अहलावत, राणी मुखर्जी, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अभय वर्मा, अर्षद वार्सी यांसारखे प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची शाहरुखच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, तरुण सध्या त्याच्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘हाऊसफुल ५’ हा बॉलीवूडमधील यशस्वी विनोदी चित्रपटांपैकी एक आहे, तर तो हिंदीतील एकमेव असा विनोदी चित्रपट आहे, ज्याचा पाचवा भाग प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.