बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी आणि शाहरुखच्या चाहत्यांनी तो ट्रेलर अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. यातील शाहरुखचे वेगवेगळे लूक्सही लोकांना फार आवडले आहेत. सोशल मीडियावरसुद्धा केवळ शाहरुख खानची चर्चा आहे. अशातच त्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याला ‘स्वदेस’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता असं वक्तव्य करताना दिसत आहे. ३० वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुख खानला आजवर एकदाही राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याची खंत त्याने यावेळी व्यक्त केली होती. त्यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सैफ अली खानला ‘हम तुम’ या चित्रपटासाठी देण्यात आला होता.

आणखी वाचा : “बॉलिवूड स्टार्स माझ्याबरोबर काम करण्यास उत्सुक पण…” अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत

२०१४ सालचा हा व्हिडीओ एका इवेंटदरम्यानचा आहे जेव्हा शाहरुख खान आणि दिग्दर्शक कुणाल कोहली हे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी शाहरुख खानने कुणालला शेवटचा पाहिलेला हिंदी चित्रपट कोणता असा प्रश्न विचारला, त्यावर कुणालने सलमानच्या ‘जय हो’ या चित्रपटाचं नाव घेतलं. यावर एकच हशा पिकला, त्यावेळी सलमान आणि शाहरुख यांच्यातील वैर संपलं नव्हतं. शाहरुख कुणालची खिल्ली उडवत म्हणाला, “लोकांच्या आवडी निवडीची जवाबदारी कुणीच नाही घेऊ शकत.”

यानंतर जेव्हा कुणालने तोच प्रश्न शाहरुखला विचारला त्यावेळी उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “माझं मॅन स्वच्छ आहे. मला सगळेच चित्रपट आवडतात, सगळे अभिनेते आवडतात, सगळ्या अभिनेत्री आवडतात. मी एक सामान्य माणूस आहे, मला प्रत्येक गोष्ट पसंत पडते. मला तुझे चित्रपटही आवडतात. ‘फना’ हा एक उत्कृष्ट चित्रपट होता, तुझा ‘हम-तुम’ हा चित्रपटही चांगला होता. या चित्रपटासाठी यातील अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. खरंतर तो पुरस्कार मला मिळायला हवा होता, पण ती वेगळी गोष्ट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये शाहरुख २००४ सालाबद्दल बोलताना दिसत आहे. ते वर्षं शाहरुख खानसाठी फारच चांगलं होतं. त्या वर्षात त्याचे ‘मैं हूं ना’, ‘स्वदेस’ आणि ‘वीर-जारा’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. तीनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यावेळी ‘स्वदेस’साठी शाहरुख खानची राष्ट्रीय पुरस्कारासाठी बरीच चर्चा होत होती. सध्या प्रेक्षक शाहरुख खानच्या ‘जवान’ची आतुरतेने वाट बघत आहेत.