Sharad Kelkar on Hindi Marathi conflict : महाराष्ट्रात सध्या हिंदी-मराठी भाषा वाद हा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर कलाविश्वातूनही अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या प्रितिक्रिया दिल्या आहेत. बऱ्यापैकी सर्व कलाकारांनी महाराष्ट्रात मराठीच याला दुजोरा दिलेला पाहायला मिळतं. त्यासह लोकप्रिय बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टी यांनीसुद्धा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राहतो, तर मराठी आली पाहिजे, असं म्हटलं होतं. अशातच आता बॉलीवूडमधील अजून एका प्रसिद्ध अभिनेत्याने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसिद्ध अभिनेता शरद केळकरने मराठी-हिंदी भाषा वादावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. शरदने ‘IANS’शी संवाद साधला आहे. त्यामध्ये त्याला राज्यात सुरू असलेल्या मराठी-हिंदी वादाबद्दल विचारण्यात आलं होतं. शरद त्यावर म्हणाला, “खरं तर मला राजकीय गोष्टींमध्ये फार रस नाही. मी याबाबत काहीही न बोलणं योग्य समजतो. मी सर्व भारतीय भाषांचा आदर करतो. माझ्यासाठी राष्ट्र सर्वप्रथम आहे”.
शरद पुढे याबाबत म्हणाला, “या गोष्टींव्यतिरिक्त तुम्ही मला अभिनयाबद्दल विचारा. मी खूप बोलेन. मी आजवर मराठी चित्रपट का नाही केले? याबाबत विचारा मी ते सांगतो”. दरम्यान, शरद केळकर लवकरच एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो ‘झी टीव्ही’वरील ‘तुम से तुम तक’ या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे. आज (७ जुलै) त्याची ही मालिका प्रदर्शित होणार आहे.
बऱ्याच दिवसांनी तो टेलिव्हिजवर परतला आहे. या मुलाखतीमध्ये त्यानं छोट्या पड्यावरील पुनरागमनाबद्दलही सांगितलं आहे. यावेळी त्याला तो या मालिकेत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे का? असं विचारण्यात आलं. त्यावर अभिनेता म्हणाला, “मी गेली दोन दशकं काम करत आहे. मी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे हो मी त्यासाठी पैसे घेतो. त्यात काय चुकीचं आहे? जर कोणीतरी चांगल कमवत असेल, तर इतर लोकांना आनंद व्हायला हवा”.
शरद पुढे म्हणाला, “कोणी जर चांगलं कमवत असेल, तर त्यामुळे त्याच्याबद्दल हेवा वाटून घेण्यापेक्षा त्यानं मिळवलेल्या यशाचं कौतुक करायला हवं. जर एखादा कलाकार टेलिव्हिजनवर पुनरागमन करीत असेल, तर त्याचा अर्थ त्याला त्याची जाण आहे. कोणीही तुम्हाला उगाच काम देत नाही. तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागतं”.