ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना बॉलिवूडचे ‘शॉटगन’ म्हणून ओळखलं जातं. ते चित्रपटसृष्टीसह खऱ्या आयुष्यातही डॅशिंग पर्सनिटीसाठी ओळखले जातात. शत्रु्घ्न सिन्हा यांनी आतापर्यंत विविध चित्रपटात काम केले आहे. सर्वांना ‘खामोश’ करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतंच दीवार आणि शोले या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
कोलकातामध्ये आयोजित केलेल्या ‘साहित्य आजतक २०२३’ या कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी चित्रपट, सिनेसृष्टी, बॉयकॉट या विषयांसह विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना कोणते चित्रपट न केल्याबद्दल अजूनही पश्चात्ताप होतो, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “आमच्या दोघांमध्ये भांडण…” अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा स्पष्टच बोलले
“मी माझ्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत ‘शोले’ आणि ‘दीवार’ हे दोन चित्रपट केले नाहीत, याची खंत मला अजूनही वाटते. दीवार हा चित्रपट माझ्यासाठी लिहिण्यात आला होता. या चित्रपटाची स्क्रिप्ट तब्बल ६ महिने माझ्याकडे होते. पण विचारांमध्ये मतभेद असल्याने मला त्या चित्रपटात काम करता आले नाही”, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.
“मला ‘शोले’ या चित्रपटाचीही ऑफर देण्यात आली होती. या चित्रपटात मी गब्बरची भूमिका करावी, अशी निर्मात्यांची इच्छा होती. मला देखील ‘शोले’ हा चित्रपट करायचा होता. पण तारखांचा गोंधळ होता. त्यावेळी रमेश सिप्पींनी तारखांबद्दल सांगितले नाही. तर दुसरीकडे माझ्याकडेही खूप चित्रपट होते. त्यामुळे मला तो चित्रपट करता आला नाही.”
आणखी वाचा : महागड्या गाड्यांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर शाहरुख खानचा खुलासा, म्हणाला “माझ्याकडे…”
“मला ‘शोर’ या चित्रपटात प्रेमनाथची भूमिका करायची होती. त्यावेळी माझ्याकडे चार महिन्यांचा वेळ मागितला होता. पण मी ते करु शकलो नाही. याचा मला आजपर्यंत पश्चाताप होतो. त्यावेळी मनोजकुमार घरी आले होते. त्यांनी मला का करत नाही, असेही विचारले होते. मी मात्र त्यांना मी हे करु शकत नाही, असे सांगितले होते.”
“पण या चित्रपटात ज्या लोकांनी काम केले, ते फार चांगले होते याचा मला आनंद आहे. ‘दीवार’ आणि ‘शोले’ या दोन चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आणि त्यामुळे ते स्टार बनले याचा मला आनंद आहे”, असेही शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले.