Karisma Kapoor Abhishek Bachchan Breakup: करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचं निधन झालंय. १२ जून २०२५ रोजी पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने संजय कपूरची प्राणज्योत मालवली. संजय कपूर ५३ वर्षांचे होते. सोना कॉमस्टारचे चेअरमन संजय कपूर हे उद्योगपती होते. त्यांचा व्यवसाय भारताबाहेर अनेक देशांमध्ये आहे.
संजय कपूर हे आघाडीचे उद्योगपती होते, पण त्याचबरोबर ते वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहायचे. संजय कपूर यांनी ३ लग्नं केली आणि त्यांच्या तिन्ही पत्नी ग्लॅमर विश्वातल्या होत्या. त्यांची दुसरी पत्नी करिश्मा कपूर होती. संजय यांच्या निधनानंतर करिश्मा व त्यांच्या घटस्फोटाबद्दलही बोललं जातंय. संजय यांनी करिश्मावर घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान काही आरोप केले होते, त्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
२००३ मध्ये संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे लग्न झाले होते. या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती, कारण करिश्मा व अभिषेकचा साखरपुडा जानेवारी महिन्यात मोडला आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी करिश्माने संजयशी लग्न केलं. बिग बींच्या ६० व्या वाढदिवशी अभिषेक व करिश्माच्या लग्नाची घोषणा करण्यात आली, पाच वर्षांचं दोघांचं नातं होतं पण लग्नाआधीच दोघांचं नातं तुटलं अन् करिश्माने संजयबरोबर संसार थाटला.
करिश्मा कपूरवर संजय कपूरचे आरोप
कॉस्मोपॉलिटनच्या एका रिपोर्टनुसार, करिश्माची आई बबिता कपूरने तिचं अभिषेकशी लग्न होऊ दिलं नाही. त्यानंतर काही महिन्यात करिश्माने घटस्फोटित संजय कपूरशी लग्न केलं, मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. दोघांना समायरा व कियान ही मुलं झाली. करिश्मा २०१० मध्ये मुलांना घेऊन मुंबईला परत आली आणि २०१४ मध्ये करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला, त्यानंतर २०१६ मध्ये ते कायदेशीररित्या वेगळे झाले.

करिश्मा व संजयच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. संजयच्या मते करिश्माने पैशांसाठी त्याच्याशी लग्न केलं होतं. तसेच अभिषेकबरोबर ब्रेकअप झाल्याने त्या नात्यातून सावरायला करिश्माने लग्न केलं आणि माझा वापर केला, असं संजय म्हणाला होता.
करिश्मा चांगली पत्नी नव्हती, ती भावनिकरित्या या नात्यात गुंतली नव्हती. घटस्फोटानंतर तिने मुलांना त्यांचे वडील व कुटुंबाला भेटू देत नव्हती, असंही संजयने म्हटलं होतं. यावर करिश्माच्या वकिलांनी म्हटलं होतं की “संजय व त्याचे कुटुंब खोट्या गोष्टी पसरवत आहेत, यामुळे मुलांवर परिणाम होत आहे. मीडिया ट्रायल आम्हाला नकोय.
संजय कपूर व करिश्मा कपूरचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला आणि वर्षभराने २०१७ मध्ये संजय कपूरने तिसरं लग्न केलं. त्याच्या तिसऱ्या पत्नीचं नाव प्रिया सचदेव आहे. घटस्फोटाच्या आधीपासूनच संजय प्रियाला डेट करत होता. प्रिया सचदेवपासून संजयला एक मुलगा झाला. प्रियाला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी होती, तीही त्यांच्याबरोबरच राहते.