Shefali Jariwala Building Watchman Video: अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालं आहे. ४२ वर्षांच्या शेफालीला हृदयविकाराचा झटका आला. तिला पती पराग त्यागीने मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नेलं. पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. शेफालीच्या निधनामुळे चाहत्यांना व तिच्या इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींना धक्का बसला आहे. शेफालीच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने तिच्या निधनाबद्दल काय सांगितलं? ते पाहुयात.
शेफाली व पराग यांचं मुंबईतील अंधेरी भागात घर आहे. घरीच तिची प्रकृती खालावल्याने पराग व इतर २-३ जण तिला घेऊन रुग्णालयात गेले होते. शेफालीच्या निधनाची बातमी रात्री ११ वाजता आली, पण तिला त्याआधीच रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने काय पाहिलं?
“मी शेफाली जींना पाहिलं नाही, पण त्यांची गाडी जात असताना मी गेट उघडला. रात्रीचे १०-१०.१५ वाजले होते. नंतर मला काहीच माहीत नव्हतं. रात्री १ वाजता मला कोणीतरी येऊन सांगितलं की शेफाली जींचं निधन झालंय. त्यावर मी विश्वास ठेवला नव्हता, कारण त्या अगदी व्यवस्थित होत्या. त्यानंतर त्या व्यक्तीने मला त्यांचा फोटो दाखवला. त्यांचाच कोणतरी मित्र होता. मी त्याला सांगितलं की मला कन्फर्म माहीत नाही, त्यामुळे तिच्या घरी जाऊन विचारा. पण तो घरी न जाता रुग्णालयात गेला,” असं सुरक्षा रक्षक म्हणाला.
पराग व शेफाली यांना शेवटचं दोन दिवसांपूर्वी एकत्र पाहिलं होतं, दोघेही फिरत होते असं सुरक्षा रक्षकाने सांगितलं. सध्या पोलीस व फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरी तपास करत आहे. शेफालीचा पती पराग त्यागीदेखील रुग्णालयातून घरी परत आला आहे. तो पोलिसांना शेफालीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करतोय.
दुसरीकडे, शेफालीचे आई-वडील कूपर रुग्णालयात पोहोचली. तिची आई रुग्णालयाबाहेर हमसून हमसून रडत होती. तिचे मित्र-मैत्रिणीही रुग्णालयात पोहोचले आहेत. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्याने ४२ व्या वर्षी ती जग सोडून गेली. तिच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नसल्याच्या पोस्ट तिचे सहकलाकार करत आहेत. मिका सिंग, अली गोनी यांनी शेफालीच्या निधनाबद्दल पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे.