Shilpa Shirodkar’s Comeback In Bollywood After 25 Years : शिल्पा शिरोडकर बॉलीवूडमधील ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर अनेक वर्षांनंतर तिनं ‘बिग बॉस १८’मधून पुनरागमन केलं. अशातच आता अभिनेत्री २५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शिरोडकर लवकरच बॉलीवूड चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. अभिनेत्री यापूर्वी ‘बिग बॉस’मध्ये झळकलेली, ज्यामुळे ती खूप चर्चेत आली. अशातच आता शिल्पाचा नवीन चित्रपटही येत असून, त्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे.

शिल्पा शिरोडकर २५ वर्षांनंतर करणार पुनरागमन

शिल्पानं शेवटचं २००० साली ‘गज गामिनी’ चित्रपटात काम केलेलं. त्यानंतर आता ती २५ वर्षांनंतर ‘जटाधरा’ या आगामी चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी व तेलुगू या भाषांत ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

वेंकट कल्याण व अभिषेक जैस्वाल दिग्दर्शित ‘जटाधरा’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा व शिल्पा शिरोडकरबरोबर लोकप्रिय दाक्षिणात्य कलाकार झळकणार आहेत. १७ ऑक्टोबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. आता येत्या ७ नोव्हेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

आताच्या काळातील सिनेमाबद्दल शिल्पानं एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. ‘जागरण’च्या वृत्तानुसार ती म्हणाली, “आज सिनेमा आणि त्यासाठीचं लेखन खूप बदललं आहे. प्रत्येकासाठी काम आहे. या चित्रपटात मला जी भूमिका मिळाली आहे, त्यासाठी मी कधीच विचारही केला नव्हता. मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. कामं मिळतात; पण घरी बसून नाही मिळत. तुम्ही म्हणाल की मला काम हवंय पण मी घरीच बसून राहणार तर मग तुम्हाला काम मिळणार नाही.”

शिल्पाने यावेळी ती पूर्वी चित्रपटाला यश मिळावं म्हणून उपवास वगैरे करायची असं म्हटलं आहे. याबद्दल ती म्हणाली, “मी उपवास करायचे, सिद्धिविनायक मंदिरात चालत जायचे असं खूप काही करायचे आता माहीत नाही काय काय करेन. शिल्पा पुढे बिग बॉसबद्दलही बोलली आहे. शिल्पाचं मनोरंजन क्षेत्रात पुनरागम झालं ते ‘बिग बॉस’मधूनच. सलमान खानच्या ‘बिग बॉस’मध्ये तिनं चांगला खेळ खेळला होता. ‘बिग बॉस’च्या घरात असताना ती सतत चर्चेत असाची. त्यामुळे ‘बिग बॉस’ची तिला खऱ्या अर्थानं मदत झाली.