Akshay Kumar Upcoming Haiwaan Movie : लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. रविवारी २४ ऑग्स्ट रोजी त्याने सोशल मीडियावर त्याच्या ‘हैवान’ या आगामी थ्रिलर चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांना माहिती दिली. अशातच आता या चित्रपटात त्याच्यासह मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली असल्याचे म्हटले जात आहे.
अक्षय कुमारच्या ‘हैवान’ या आगामी थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन ‘फिर हेरा फेरी ३’चे दिग्दर्शक प्रियदर्शन करणार आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमार व सैफ अली खान तब्बल १८ वर्षांनंतर एकत्र काम करीत आहेत. त्यांच्यासह या चित्रपटात अभिनेते बोमन इराणीसुद्धा झळकणार आहेत. अशातच आता अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरही या चित्रपटामध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार श्रिया पिळगावकरची या चित्रपटासाठी निवड झाली असून, ती अक्षय कुमार व सैफ अली खान यांच्यासह झळकणार आहे. श्रिया पहिल्यांदाच अक्षय कुमार व सैफ अली खान यांच्यासह काम करणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच याबद्दल चर्चा सुरू आहे.
‘हैवान’ हा चित्रपट (Oppam) या मल्याळी चित्रपटाचा रिमेक आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून, स्वत: अक्षय कुमारनेच याबद्दल सोशल मीडियावरून माहिती दिली होती. अक्षय व सैफ १८ वर्षांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. ते दोघे शेवटचे ‘टशन’ या २००८ साली आलेल्या चित्रपटात झळकले होते.
श्रिया गेल्या काही दिवसांत ‘मंडला’ मर्डर्स या तिच्या वेब सीरिजमधील कामामुळे चर्चेत होती. अनेकांनी तिचे यासाठी कौतुक केले. स्वत: सचिन पिळगावकर व सुप्रिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत लेकीचे कौतुक केले होते. तिने २०१६ साली आलेल्या ‘फॅन’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माईंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’ व ‘ताजा खबर’ यांसाख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ‘गिल्टी माईंड्स’मधील तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअरचे नामांकनही मिळाले होते.