Smriti Iranai Talks About Deepka Padukone : स्मृती इराणी यांनी काही दिवसांपूर्वी अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं. त्या एकेकाळी हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा होत्या. सध्या ‘क्योंकि सॉंस भी कभी बहू थी २’मधून झळकत आहेत. अशातच त्यांनी दीपिका पादुकोणच्या दिवसाला ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

टेलिव्हिजनवर काम करणारे कलाकार दिवसाला १२-१४ तास काम करीत असतात. त्याबद्दल ते अनेकदा मुलाखतींमधून सांगत असतात. अशातच आता स्मृती यांनीसुद्धा त्यांचा याबद्दलचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्या त्यांच्या निर्मात्यांचं नुकसान होऊ नये यासाठी नेहमी प्रयत्नशील असायच्या याबद्दल सांगितलं आहे.

स्मृती मुलाखतीत म्हणाल्या, “मला असं वाटतं की, एक इंडस्ट्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण इंडस्ट्रीतील मार्केट व्हॅल्यू वाढवण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मला असं वाटतं की, इंडस्ट्रीत कायमच फक्त सर्जनशीलतेला अधिक महत्त्व दिलं जातं आणि मार्केट व्हॅल्यूकडे तितकं लक्ष दिलं जात नाही.”

स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया

स्मृती यांनी पुढे दीपिकाच्या दिवसाला फक्त ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल सांगितलं, हा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना यात पडायचं नाहीये. अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “मी फक्त एवढंच म्हणेन की, मी दोन वेळा गरोदर असताना काम केलं आहे. मी माझ्या निर्मात्यांना यश मिळावं यासाठी खूप प्रयत्नशील असायचे. कारण- मला ती कलाकार म्हणून माझी जबाबदारी वाटते.”

स्मृती पुढे म्हणाल्या, “आज मला हे पूर्णपणे समजलं आहे की, जर मी सातत्यानं माझ्या निर्मात्याला पाठिंबा दिला नाही, तर त्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो आणि ते त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे. जर मी कामावर गेले नाही, तर त्या दिवशी १२० जणांना पगार मिळत नाही. म्हणजेच १२० कुटुंबांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आता मी माझ्या कामाकडे आणि माझ्या कामाच्या जबाबदारीकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टीने पाहते.”

स्मृती इराणी यांनी पुढे सांगितलं की, अभिनेत्री होणं, राजकारणात प्रवेश करणं आणि आईपण अनुभवणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्याबद्दल त्या म्हणाल्या, “जर मी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला, तर मग त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे.”