सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘हम साथ साथ हैं’ हा चित्रपट १९९९ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आजही या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटातील कलाकार आणि त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले.
‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटात रीमा लागू, सलमान खान, तब्बू, नीलम कोठारी, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, सैफ अली खान, मोहनीश बहल, आलोक नाथ, सतीश शाह, असे अनेक कलाकार या चित्रपटात पाहायला मिळाले होते. विशेष बाब म्हणजे प्रत्येक पात्राचे एक वेगळेपण होते. एका कुटुंबाची गोष्ट पाहायला मिळाली होती.
सोनाली बेंद्रेपुढे दिग्दर्शकाने ठेवलेली ‘ही’ अट
या चित्रपटात सोनाली बेंद्रेने डॉक्टर प्रीती ही भूमिका साकारली होती. हळू व गोड आवाजात बोलणारी, थोडी लाजणारी, प्रेमळ अशी ही डॉक्टर प्रीती पाहायला मिळाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली बेंद्रेने तिच्या या भूमिकेबाबत वक्तव्य केले आहे. ती खऱ्या आयुष्यात अजिबात डॉक्टर प्रीतीसारखी नाही, असे अभिनेत्री म्हणाली.
सोनाली ब्रेंद्रेने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटातील भूमिकेबाबत म्हणाली, “त्या काळात माझे केस सरळ असायचे, क्रॉप टॉप व जीन्सवर मी पैंजण घालायचे. माझे नाक टोचलेले होते आणि मी नोज रिंग घालायचे. जेव्हा मी शूटिंग करीत नसायचे, त्यावेळी मी अशी राहायचे. मी जीन्स परिधान केली असली तरी मी पारंपरिक भारतीय दागिने घालायची. मी साडी व सलवार-कुर्तादेखील परिधान करायचे.”
सोनाली पुढे म्हणाली, “मी सूरज बडजात्यांना भेटले तेव्हा मी पांढऱ्या रंगाचा सलवार-कुर्ता परिधान केला होता. मी त्यावेळी शूटिंग करीत नव्हते, तर मी नोज रिंग घातली होती. पण, सूरज बडजात्या यांनी मला सांगितले की, पात्र हे डॉक्टर आहे. त्यामुळे तिने पाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव केला पाहिजे. जेव्हा मी चित्रपटाची पटकथा ऐकली, त्यावेळी मला असे वाटले की, या पात्राने भारतीय पारंपरिक कपडे परिधान केले पाहिजेत. कारण- ती मुलगी एका भारतीय कुटुंबातील आहे. जरी ती डॉक्टर होण्यासाठीचे शिक्षण घेत असली तरी तिने पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे का परिधान केले पाहिजेत, असा मला प्रश्न पडला.”
“मी सूरज बडजात्यांना त्याबद्दल सांगितले, तर त्यांनी त्यावर सहमती दर्शवली. मात्र, त्यांनी माझ्यापुढे एक अट ठेवली. ते म्हणाले होते की, जरी तू या भूमिकेसाठी भारतीय पद्धतीचे कपडे परिधान केलेस तरी तू ही नोज रिंग शूटिंगदरम्यान वापरशील, असे मला वचन दे. त्यावर मीदेखील सहमती दर्शवली”, असे सोनाली बेंद्रेने सांगितले.
दरम्यान, सोनाली बेंद्रेला आजही त्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून प्रेम मिळते. तिचे कौतुक होते. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे, तर ‘झी ५’वरील ब्रोकन न्यूज या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिच्या या भूमिकेचेदेखील मोठे कौतुक झाले. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.