Sonu Sood Viral Video: कोविड काळात सोनू सूदने केलेल्या कामाचं आजही सगळेच कौतुक करतात. केंद्र सरकारपासून ते अगदी सामान्यांपर्यंत कित्येकांच्या मनात सोनू सूद हा खऱ्या आयुष्यातील हिरो म्हणून समोर आला आहे. सोनूने सुद्धा आपल्या कामातून वेळोवेळी आपल्यावरील हा विश्वास सार्थकी लावला आहे. अलीकडे व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत सोनू असं काही करून बसला की आता सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं.

या व्हिडिओमध्ये तो ट्रेनच्या दरवाज्यात बसला आणि मस्त ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेत होता. हा व्हिडिओ मात्र त्याला चांगलाच महागात पडला आहे. अगदी ट्रेनच्या दाराच्या टोकावर फक्त पायाच्या बोटांवर उभं राहून सोनुने केलेला हा प्रताप सध्या तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी सोनू सूदवर कारवाईची मागणी केली. एवढंच नाही तर उत्तर रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही सोनूचे चांगलेच कान ओढण्यात आले.

‘उत्तर रेल्वे’च्या अकाऊंटवर सोनूचा व्हिडिओ शेअर करून त्यावर लिहिण्यात आलं, “तुम्हाला आज संपूर्ण देश फॉलो करतो, तुम्ही त्यांच्यासाठी आदर्श आहात, पण असा गाडीच्या टोकावर बसून प्रवास करणं धोकादायक आहे. कृपया असं करू नका.” यानंतर सोनूवर आणखी टीका होऊ लागली, नेटकऱ्यांनीही त्याला चांगलेच खडेबोल सुनावले. या ट्वीटला सोनूने जे उत्तर दिलं आहे त्याची चर्चा सध्या होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ट्वीटला उत्तर देत सोनू म्हणाला, “सर्वप्रथम मी क्षमा मागतो. लाखो गरीब लोकांचं आयुष्य अजूनही या ट्रेनच्या दरवाज्यात बसूनच निघून जातं तेव्हा त्यांना कसं वाटत असेल याचाच अनुभव घेण्यासाठी मी बसलो होतो. हा मेसेज देण्यासाठी आणि देशाच्या सोयी सुविधा आणखी उत्तम बनवण्यासाठी तुमचे मनापासून आभार.” सोनूच्या या ट्वीटची जबरदस्त चर्चा होत आहे. माफी मागत त्याने एक मोठी गोष्ट या ट्वीटच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या व्हिडिओला सोशल मीडियावर तब्बल ५ लाखाहून अधिक व्ह्यूज आले आहेत.