‘कंटेंट हाच खरा बादशाह आहे’ हे पुन्हा एकदा राजश्री प्रोडक्शनने सिद्ध करून दाखवलं आहे. ‘उंचाई’ या चित्रपटाच्या माध्यमातून राजश्री प्रोडक्शन आणि सुरज बडजात्या यांनी हे दाखवून दिलं की उत्तम कथानक असेल तर प्रेक्षक चित्रपटगृहाकडे आपसूक खेचले जातात. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. प्रेक्षकच चित्रपटाचं कौतुक करू लागल्याने कोणत्याही समीक्षणाची वाट न पाहता लोक तिकीटबारीवर गर्दी करताना दिसत आहेत.

या चित्रपटाची सुरुवात काही खास झाली नव्हती. दाक्षिणात्य अभिनेत्री समांथाचा ‘यशोदा’ आणि हॉलिवूडपट ‘ब्लॅक पॅंथरच्या तुलनेत ‘उंचाई’ची कमाई ही अगदीच कमी होती, पहिल्याच दिवशी चित्रपटाने १.८० कोटीच्या आसपास कमाई केली होती. पण केवळ प्रेक्षकांच्या प्रतिसादावर या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ५०% जास्त कमाई केली आहे. दुसऱ्या दिवसापर्यंत ‘उंचाई’ची एकूण कमाई ही ३ कोटीच्या आसपास होती, पण आता तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने भरगोस कमाई करून लोकांना आश्चर्यचकित करून टाकलं आहे.

आणखी वाचा : “माझ्या आयुष्यावर बायोपिक बनवू नका कारण…” अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची कळकळीची विनंती

फक्त तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ५.०५ कोटी इतकी कमाई केली आहे जी या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईच्या पाचपट आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की प्रेक्षकांच्या शब्दाखातर आणि उत्तम कथानकामुळे या चित्रपटासाठी लोक उत्सुक आहेत. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्शनेदेखील या चित्रपटाच्या यशाची दखल घेतली. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “उंचाईने जे यश गाठलं आहे ते मोठमोठ्या बिग बजेट चित्रपटांनाही कोविड काळानंतर गाठता आलेलं नाही. त्यामुळे प्रेक्षक हेच किंगमेकर आहेत हे पुन्हा एकदा या चित्रपटाने सिद्ध केलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरज बडजात्या यांनी बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटासाठी काम केलं आहे. २०१५ मध्ये आलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटानंतर आज सुरज बडजात्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ही ४ मित्रांच्या घनिष्ट नातेसंबंधांची गोष्ट आहे. यात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, डॅनी, बोमन इराणी, सारिका, नीना गुप्तासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.