‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)ने तिच्या करिअरमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘दिल’, ‘हम आपके है कौन’, ‘देवदास’, ‘दिल तो पागल है’, ‘खलनायक’ अशा अनेक सिनेमांमधील अभिनेत्रीच्या भूमिकांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. नुकतीच ‘भूल भूलैय्या ३’मध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. आता दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी एका चित्रपटात माधुरी दीक्षितला कास्ट करणे योग्य वाटत नव्हते, असा खुलासा केला आहे.

जर सलमान खानबरोबर कास्ट केले तर…

सूरज बडजात्या यांनी रेडिओ नशाला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. या चित्रपटात तब्बू, करीश्मा कपूर, सोनाली बेंद्रे या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या. मात्र, या चित्रपटात माधुरी दीक्षितनेसुद्धा काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी आठवण सूरज बडजात्या यांनी सांगितली आहे. याबद्दल बोलताना सूरज बडजात्या यांनी सांगितले की, मी माधुरीला सांगितले की मी पुरुषांचे वर्चस्व असलेला चित्रपट बनवत आहे. तुला जर सलमान खानबरोबर कास्ट केले तर ती तुझ्यासाठी खूप छोटी भूमिका होईल. जर मी मोहनीश बहल विरुद्ध कास्ट केले तर तुला सलमान खानच्या वहिनीची भूमिका करायला लागेल, ती खूप प्रेमळ आहे. तिने मला म्हटले की ठीक आहे, एकत्र काम करायला मजा येईल, पण त्यानंतर मी तिला सांगितले की मला योग्य वाटत नाहीये.”

पुढे याबद्दल अधिक बोलताना सूरज बडजात्या यांनी सांगितले की, ‘हम साथ साथ है’ चित्रपटाआधी ‘हम आपके है कौन’मध्ये सलमान खान माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिकेत काम केले होते. या चित्रपटाला मोठे यश मिळाले होते, त्यामुळे ते दोघे ऑनस्क्रीनवरचे लोकप्रिय जोडपे होते. सूरज बडजात्या यांनी म्हटले की, सलमान खान लोकप्रिय अभिनेता होता, त्यामुळे अशी कोणीतरी अभिनेत्री पाहिजे होती, जिला वहिनीच्या रूपात प्रेक्षकांकडून स्वीकारले जाईल, त्यामुळे तब्बूची त्या भूमिकेसाठी निवड केली. या चित्रपटात सोनाली बेंद्रेने सलमान खानबरोबर प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. या चित्रपटात सैफ अली खान, करीश्मा कपूर, सोनाली बेंद्रे, तब्बू, सलमान खान, मोहनीश बहल, आलोक नाथ, नीलम कोठारी असे कलाकार प्रुमख भूमिकेत दिसले होते. आजही या चित्रपटाचा एक चाहता वर्ग असल्याचे पाहायला मिळते.