Kiran Kumar on Sridevi: अभिनेत्री श्रीदेवी या बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांचे चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे. ‘मैं तेरा दुश्मन’, ‘आखिरी रास्ता’, ‘नगिना’, ‘तोहफा’ ते ‘मॉम'(MOM), ‘इंग्लिश विंग्लिश’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हिंदीसह त्यांनी तमीळ चित्रपटसृष्टीतदेखील काम केले आहे.
याबरोबरच अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, अनिल कपूर अशा लोकप्रिय कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. त्यांच्या निधनानंतरही अनेक कलाकार त्यांच्या आठवणी सांगतात. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. आता बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते किरण कुमार यांनी श्रीदेवींबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
किरण कुमार यांनी खुदा गवाह या १९९२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्या चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील प्रमुख भूमिकेत होते. निर्माते व दिग्दर्शक मुकुल एस. आनंद यांनी या चित्रपटातील पाशा ही भूमिका अमरीश पुरी यांच्यासाठी लिहिली होती. मात्र, काही कारणामुळे किरण कुमार यांना पाशा ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या पात्रामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. पाशा या भूमिकेमुळे अमिताभ बच्चन व श्रीदेवी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल किरण कुमार यांनी मुकुल आनंद यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
किरण कुमार यांनी नुकतीच ‘रेड एफएम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत श्रीदेवी यांच्याबाबत अभिनेते म्हणाले की, श्रीदेवींबरोबर माझे खूप जवळचे असे संबंध नव्हते. भेटल्यानंतर एकमेकांना नमस्कार करण्यापुरते आमचे संबंध होते. श्रीदेवींनी कोणालाही फार जवळ केले नाही. त्यामुळे मी त्यांना सेटवरच भेटायचो; पण जेव्हा त्या एखाद्या सीनचे शूटिंग करायच्या, त्यावेळी मी त्यांचे कौतुक करायचो.
“सीनचे शूट संपल्यानंतर श्रीदेवी…”
पुढे ‘खुदा गवाह’च्या क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवींबरोबर झालेल्या संभाषणाची आठवण सांगत किरण कुमार म्हणाले, “खुदा गवाहच्या क्लायमॅक्समध्ये मी पळत असतो. एका बाजूला अमितजी आणि दुसऱ्या बाजूला श्रीदेवी घोड्यावरून येतात, दोघे मिळून मला उचलतात आणि डोंगरावरून खाली ढकलतात. अशा प्रकारे पाशा मरतो, असा सीन आहे.
जेव्हा त्यांनी मला उचलले तेव्हा घोडे पळत होते. त्यापैकी एका घोड्याचा माझ्या पायावर पाय पडला आणि तो सुजला. सीनचे शूट संपल्यानंतर श्रीदेवी आल्या आणि मला विचारले की तू ठीक आहेस का? तुझ्या पायला लागले आहे. मी म्हणालो, “मी ठीक आहे. बरा होईन.” त्यानंतर त्यांनी मला विचारले की तू काळजी घ्यायला हवीस. तू या सीनसाठी तुझा ड्युप्लिकेट का वापरला नाहीस? त्यावर मी म्हणालो की, तुम्ही या सीनमध्ये मला उचलले. मजा आली. तुम्ही स्वत:ला त्रास करून घेऊ नका. माझी विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. आमच्यामध्ये इतकेच बोलणे झाले होते; पण हेदेखील खूप होते.
किरण कुमार यांनी श्रीदेवींचे कौतुकही केले. त्या बहुआयामी अभिनेत्री होत्या, असे म्हणत किरण कुमार यांनी श्रीदेवींच्या तीन भूमिकांचा उल्लेख केला, ज्या एकमेकांहून अगदी वेगळ्या होत्या. बाळू महेंद्र यांच्या १९८३ च्या रोमँटिक चित्रपट ‘सदमा’मधील भूमिका, पंकज पराशर यांचा १९८९ साली प्रदर्शित झालेला कॉमेडी चित्रपट ‘चालबाज’मधील आणि ‘खुदा गवाह’मधील अॅक्शन भूमिका या उल्लेखनीय आहेत. “त्यांनी खूप वेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांचे इतक्या लवकर निधन झाले, याचे दुःख आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘मॉम’ (MOM) हा चित्रपट अद्भुत होता. त्या जिथे आहेत, तिथे आनंदी राहाव्यात, अशी माझी इच्छा आहे”, अशा भावना किरण कुमार यांनी व्यक्त केल्या.
२०१८ मध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले. २०१७ साली त्यांनी ‘मॉम’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना त्यांना मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आता त्यांच्या मुली जान्हवी व खुशी कपूर यादेखील चित्रपटांत काम करताना दिसत आहेत.