Sridevi’s Sister Srilatha : श्रीदेवी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांना बॉलीवूडमधील पहिल्या स्त्री सुपरस्टार म्हटलं जायचं. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम केलेलं. भारतीय सिनेमातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी त्यांना एक मानलं जायचं. सौंदर्यासह अभिनयासाठीही त्यांना ओळखलं जायचं. व्यावसायिक आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या श्रीदेवी यांच्या खासगी आयुष्यात मात्र सख्ख्या बहिणीबरोबर भांडण झालेलं.
श्रीदेवी व श्रीलता या दोघी सख्ख्या बहिणी. पण, असं असतानाही श्रीदेवी यांचं २०१८ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीलाही श्रीलता गेल्या नव्हत्या असं म्हटलं जातं. दोघींमध्ये नेमका वाद काय होता, कशावरून भांडण झालेलं? जाणून घेऊयात…
श्रीदेवींचं २०१८ मध्ये निधन झालं, परंतु आजही त्या त्यांच्या चित्रपटांतील कामासाठी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आजही अनेक जण त्यांच्या कामाचं, चित्रपटांचं कौतुक करत असतात. श्रीदेवींनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम करत रेकॉर्ड केला आणि यातील सर्व चित्रपटांना बऱ्यापैकी चांगलं यश मिळालेलं. श्रीदेवींच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यामागे त्यांचे पती बोनी कपूर आणि दोन मुली जान्हवी व खूशी कपूर असं कुटुंब आहे. त्यांच्या माहेराबद्दलची फार कमी माहिती आहे. त्यांच्या बहिणीबद्दलही फार लोकांना माहिती नाहीये.
श्रीदेवी आणि त्यांच्या बहिणीमध्ये काय झालेलं?
‘जागरण’च्या वृत्तानुसार, १९९६ मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं; त्यानंतर पहिल्यांदाच या दोन बहिणींमध्ये दुरावा निर्माण झालेला. जेव्हा श्रीदेवी यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं तेव्हा शस्त्रक्रियेनंतर त्यांनी समरण शक्ती गमावली आणि पुढे आजारामुळेच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर श्रीदेवीने रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यावेळी त्यांना जवळपास ७.२ कोटी इतके पैसे रुग्णालयाकडून मिळाले.
पैशांमुळे झालेला वाद
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार श्रीदेवी यांनी हे सर्व पैसे स्वत:कडे ठेवले होते, ज्यामुळे या दोन बहिणींच्या नात्यात कटुता निर्माण झाली. यानंतर श्रीलता यांनी या पैशांमधील त्यांच्या हिश्श्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली. त्या ही केस जिंकल्या आणि त्यांना २ कोटी रुपये मिळाले. या कारणामुळे दुरावलेल्या बहिणी अगदी शेवटी श्रीदेवींच्या मृत्यूनंतरही एकत्र आल्याचं दिसलं नाही. असं म्हटलं जातं की, बोनी कपूर यांनी या दोघींमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यामध्ये काही यश मिळालं नाही. एवढंच काय तर श्रीदेवींच्या मृत्यूनंतर चेन्नई येथील त्यांच्या शेवटच्या शोकसभेलाही त्यांच्या बहिणीची उपस्थिती दिसली नाही.
