बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा चर्चेत असतात. सुनीता त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखल्या जातात. कुठल्याही विषयावर त्या नेहमी स्पष्ट बोलत असतात. अनेकदा त्या गोविंदासह कार्यक्रमांना उपस्थित असतात. यावेळी सुनीता यांनी अनेक मुलाखतींमधून गोविंदा, तसेच बॉलीवूडबद्दल स्पष्ट वक्तव्ये केली आहेत. अशातच आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी गोविंदाबद्दल अनेक अफवा पसरवल्या गेल्याचं म्हटलं आहे.

गोविंदा हा ९० च्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक. हटके स्टाईल, डॅशिंग अंदाज यामुळे त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. तर त्याचे अनेक चित्रपट त्या काळात सुपरहिट ठरले. परंतु, असं असलं तरी गोविंदाबद्दल अनेकदा तक्रारी केल्या जात असत. गोविंदा सेटवर नेहमी उशिरा यायचा, असं म्हटलं जायचं. विशेष म्हणजे गोविंदानं स्वत: मागे एका मुलाखतीमध्ये त्याबाबत सांगितलं होतं. मुकेश खन्नाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं, ”मी सेटवर वेळेवर जायचो नाही”, असं म्हणत या अफवांना दुजोरा दिला होता.

अशातच आता सुनीता आहुजा यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. ‘झूम’शी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ”गोविंदाबद्दल सेटवर अफवा पसरवल्या जायच्या, तो कधीच सेटवर उशिरा गेला नाही; पण सेटवर अनेकदा त्याच्यामागे बोललं जायचं. गोविंदाविरुद्ध इंडस्ट्रीमध्ये राजकारण केलं गेलं. गरीब घरातून आलेला माणूस प्रसिद्धी मिळवत असेल, तो यशस्वी होत असेल, तर अनेकांना ते बघवत नाही. त्याचे कितीतरी चित्रपट यामुळे प्रदर्शित झाले नाहीत. मी कोणाचं नाव घेणार नाही; पण इंडस्ट्रीत खूप राजकारण केलं जातं.”

सुनीता पुढे असंही म्हणाल्या, “गोविंदाकडे कुठलाही अभिनयाचा वारसा नसताना त्यानं स्वत: सगळं कमावलं आहे आणि हाच सल्ला मी माझ्या मुलांना देते. माझ्या दोन्ही मुलांनी खूप कष्ट घेतले आहेत; पण मी त्यांना हेच सांगते की, गोविंदाचं नाव वापरून काम मिळवायचं नाही. तुम्ही स्वत: मेहनत करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करा. जर नशिबात लिहिलं असेल, तर तुम्हीसुद्धा खूप मोठे व्हाल”.

दरम्यान, गोविंदा यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलायचं झालं, तर गोविंदा व सुनीता आहुजा यांनी ११ मार्च १९८७ रोजी लग्न केलं होतं. या दोघांना टीना आहुजा, व यशवर्धन आहुजा, अशी दोन मुलं आहेत. तर लवकरच गोविंदा यांचा मुलगा यशवर्धन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारविजेते साई राजेश दिग्दर्शित चित्रपटात यशवर्धन अहुजा व बाबिल खान हे दोघे पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.