Sunny Kaushal post about Katrina Kaif Vicky Kaushal Baby Boy : कतरिना कैफ व विकी कौशल यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. ४२ वर्षांच्या कतरिना कैफने आज, ७ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला. विकी कौशलने इन्स्टाग्रामवर ही गुड न्यूज शेअर केली. आता विकीचा भाऊ सनी कौशलने बाळाच्या जन्माबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता सनी कौशल हा विकी कौशलचा धाकटा भाऊ आहे. विकी व सनी दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघेही एकमेकांबरोबरच्या पोस्ट शेअर करत असतात. सनीचे दादा-वहिनी आई-बाबा झाल्यावर त्याचा आनंद गगनात मावेना. चिमुकल्याच्या जन्मानंतर काका सनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

विकी कौशलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी दिली. हीच पोस्ट सनीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत “मी काका झालो,” असं लिहिलं आहे. सनीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

पाहा पोस्ट

sunny kaushal chacha ban gaya post viral
सनी कौशल पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

दरम्यान, सनी कौशलचं विकी व कतरिना दोघांशी खूप चांगलं बाँडिंग आहे. होळी असो वा दिवाळी कौशल कुटुंबीय प्रत्येक सण एकत्र साजरा करतात. सर्वजण घरातील प्रत्येकाच्या वाढदिवसाला खास सेलिब्रेशनही करतात. नुकताच सनीच्या आई वीणा कौशल यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त सनीने खास गाणं गायलं आणि आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

कतरिना कैफ आई होणार अशा चर्चा मागील अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. कारण कतरिना कुठेच सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही. ती शेवटची पती विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाच्या प्रिमियरला आली होती. त्यानंतर ती तिने कोणताही सिनेमा केला नाही, तसेच इव्हेंटला हजेरी लावली नाही. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा होत होत्या. अखेर काही दिवसांपूर्वी विकी व कतरिना यांनी पोस्ट करून त्यांच्या घरी चिमुकला सदस्य येणार, अशी माहिती दिली होती. आता दोघेही एका मुलाचे आई-बाबा झाले आहेत. लग्नानंतर ४ वर्षांनी विकी व कतरिनाने त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.