‘गोलियों की रासलीला: रामलीला’मध्ये दीपिका पादुकोणच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. ‘खिचडी’मध्ये हंसा हे विनोदी पात्र साकारणाऱ्या सुप्रिया यांनी आपल्या करिअरमध्ये विविधांगी भूमिका करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण सुप्रिया पाठक यांचं वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं राहिलं.
सुप्रिया पाठक यांनी अवघ्या २२ व्या वर्षी लग्न केलं होतं, पण ते फार काळ टिकलं नाही. वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. १९८६ मध्ये सुप्रिया ‘अगला मौसम’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर यांना भेटल्या. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सुप्रिया व पंकज यांनी १९८८ साली दुसरं लग्न केलं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.
“आम्ही एकत्र एक चित्रपट करत होतो आणि तो चित्रपट कदाचित फक्त आमच्या भेटीसाठी बनवला होता, कारण तो कधीच प्रदर्शित झाला नाही. आम्हा दोघांची बरीच मोठी पार्श्वभूमी होती. पण चित्रपट संपेपर्यंत आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. नंतर आम्ही आपापल्या मार्गाने गेलो. मग आम्ही एकत्र मुंबईत परतलो. पण तो चित्रपट प्रदर्शित झालाच नाही,” असं सुप्रिया पाठक ट्विंकल खन्नाच्या यूट्यूब चॅट शो ‘द आयकॉन्स’मध्ये म्हणाल्या होत्या.
सुप्रिया पाठक यांच्या आईचा होता विरोध
सुप्रिया पाठक यांची आई दिवंगत दिना पाठकसह अनेकांना त्यांचं पंकजबरोबरचं नातं मान्य नव्हतं. “प्रत्येकाने प्रयत्न केला पण मी कोणाचंही ऐकलं नाही. मी माझ्या मनात लग्न करायचं ठरवलं होतं. माझ्या आईने तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत अगदी मला दोन मुलं झाल्यानंतरही माझं मन बदलण्याचा प्रयत्न केला. ‘तो तुला सोडून जाईल’ असं ती म्हणत राहिली. इतकी वर्षे झाली, तरीही ती ‘तुझी चूक झाली’ असं म्हणत राहिली. रत्ना दीदींनी मला या निर्णयात पाठिंबा दिला होता,” असं सुप्रिया पाठक यांनी सांगितलं होतं.

सुप्रिया पाठक या शाहीद कपूरचे वडील पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. तो पंकज कपूर व निलीमा अझीज यांचा मुलगा आहे. सुप्रिया पाठक व शाहीद कपूर यांचं नातं खूप चांगलं आहे. सुप्रिया यांचे मीरा राजपूतशी पण छान संबंध आहेत. मीरा अनेकदा सुप्रिया यांच्याबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.