Satish Shah wife Madhu Shah Video: ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सतीश यांच्या जवळच्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. सतीश शाह व त्यांची पत्नी मधू शाह यांची व सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर यांची घट्ट मैत्री आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर सुप्रिया पिळगांवकरांनी भावुक पोस्ट केली आहे.
सतीश शाह यांनी निधनाच्या काही तासांआधी सचिन पिळगांवकरांना मेसेज केला होता. त्याचबरोबर त्यांनी अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनाही मेसेज केला होता. त्यानंतर त्यांचं निधन झालं. आता सुप्रिया पिळगांवकर यांनी मित्र सतीश शाह व त्यांची पत्नी मधू शाह यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट करून भावनिक कॅप्शन लिहिलं आहे.
“खूप लवकर गेलास सतीश! माझा विश्वासच बसत नाहीये की आपण मागच्या रविवारी भेटलो होतो! पण ती आठवण कायमची माझ्या मनावर कोरली गेली आहे, याचा मला आनंद आहे. मला माहित आहे की तू नेहमीच तुझ्या प्रिय मधूला बघतोय. तिच्या हास्यातून, तुझी आवडती गाणी गाताना आणि नाचताना आम्हाला तुझी उपस्थिती कायम जाणवेल,” असं सुप्रिया पिळगांवकर यांनी लिहिलं.
सुप्रिया पिळगांवकरांची पोस्ट
मुंबईत सतीश शाह यांची प्रार्थनासभा झाली. या प्रार्थनासभेत शबाना आझमी, रुपाली गांगुली, सोनू निगम, राजेश कुमारसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या प्रार्थनासभेत सतीश शाह यांच्या पत्नीची अवस्था नेटकऱ्यांना पाहवत नाहीये. मधू शाह यांना अल्झायमर आहे. सतीश शाह यांच्या प्रार्थनासभेतील त्यांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
देवाने त्यांना हिंमत द्यावी, सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली, मृत्यू हेच आयुष्याचं सत्य आहे, एकदिवस मृत्यू निश्चित आहे, मधूजींची अवस्था बघवत नाहीये अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सतीश शाह किडनीशी संबंधित समस्यांनी ग्रस्त होते. त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. शनिवारी सतीश शाह यांच्या निधनानंतर, पीडी हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरने एक निवेदन जारी केलं. त्यात म्हटलंय की सतीश शाह यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयात आपत्कालीन कॉल आला होता.
रुग्णालयातून मेडिकल टीमबरोबर एक रुग्णवाहिका तात्काळ त्यांच्या घरी पाठवण्यात आली. पण सतीश शाह काहीच प्रतिसाद देत नव्हते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत रुग्णवाहिकेत सीपीआर देण्यात आला, पण मेडिकल टीमच्या अथक प्रयत्नांनंतरही, सतीश शाह यांना वाचवता आले नाही.
