अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या तिच्या ‘आर्या ३’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तसंच सुश्मिता सेनने साकारलेली ‘ताली’ ही वेब सीरिजही चर्चेत होती. आपल्या खास अभिनयाने आणि मन मोहून टाकणाऱ्या अभिनयाने सुश्मिताने प्रेक्षकांची मनं कायमच जिंकली आहेत. मात्र एक काळ असाही होता जेव्हा ऐश्वर्या रायशी स्पर्धा नको म्हणून सुश्मिताने मिस इंडिया स्पर्धेचा अर्ज मागे घेतला होता. आज सुश्मिताचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपण जाणून घेणार आहोत तिच्या आयुष्यातले असेच काही किस्से.
सुश्मिता सेनची उंची जन्मापासूनच चर्चेत
सुश्मिता सेनचा जन्म झाला त्यावेळी तिची उंची २२ इंच होती. त्यामुळे तिच्या उंचीची कायमच चर्चा झाली. एका मुलाखतीत सुश्मिताच्या आईने हे सांगितलं होतं की मी त्यावेळी माझ्या मुलीला जन्म दिला होता. तिची उंची पाहण्यासाठी अनेक लोक तेव्हा यायचे. कारण जन्मतःच तिची उंची २२ इंच होती. तिने खऱ्याखुऱ्या आयुष्यातही जी उंची गाठली ती उंची इतर कुणालाही खरंतर कुणालाच गाठता आलेली नाही. वयाच्या १८ व्या वर्षी मिस इंडिया, त्यानंतर मिस युनिव्हर्स आणि त्यानंतर सिंगल मदर झालेल्या सुश्मिताने अनेक चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका केल्या.
ऐश्वर्या राय स्पर्धेत होती म्हणून…
मिस इंडिया स्पर्धा आहे म्हणून मला बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी मला आयोजकांनी विचारलं आत्तापर्यंत मिस इंडिया स्पर्धेतून २५ मुलींना नाव मागे घेतलं आहे. तू तसं करणार नाहीस ना? त्यावर सुश्मिता म्हणाली त्या २५ मुलींनी अर्ज मागे का घेतला? यावर आयोजक म्हणाले की स्पर्धेत ऐश्वर्या राय असल्याने इतर मुलींनी त्यांचा फॉर्म मागे घेतला आहे. ऐश्वर्या राय स्पर्धेत आहे म्हटल्यावर मी देखील भरलेला फॉर्म मागे घेतला. मी घरी आल्यानंतर आईला हे सांगितलं. ज्यावर आई मला खूप रागावली. मला म्हणाली तू स्वतःच कसं काय ठरवलंस की तू जिंकणार नाहीस? बरं तू हरलीस तरीही तू ऐश्वर्या रायकडून हरशील. ऐश्वर्या समोर आहे म्हणून स्पर्धाच नको असं का? हे ऐकल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी जाऊन फॉर्म भरला आणि ही स्पर्धाही जिंकली, असं सुश्मिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
मिस इंडिया स्पर्धेचा दिवस आला तेव्हा अर्थातच टफ फाईट झाली ती ऐश्वर्या राय आणि सुश्मिता सेन यांच्यात. या दोघींमधली स्पर्धा शेवटी टाय ब्रेकरपर्यंत गेली होती. मात्र एका प्रश्नाचं उत्तर सुश्मिताने दिलं आणि सुश्मिता विजेती ठरली. खरंतर आपण स्पर्धेतून माघार घेतोय हे सुश्मिताने ऐश्वर्यालाही कळवलं होतं. पण सुश्मिताच्या आईला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा सुश्मिताच्या आईने तिला तू स्पर्धेला सामोरं गेलं पाहिजेस असं सांगितलं आणि सुश्मिताच्या आईमुळे इतिहास घडला.
कुठल्या उत्तरामुळे सुश्मिता सेन जिंकली मिस इंडिया स्पर्धा?
मिस इंडिया स्पर्धेत सुश्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात टायब्रेकर झाल्यानंतर ऐश्वर्या रायला विचारण्यात आलं होतं की जर तुला तुझा पती म्हणून निवड करायला सांगितली तर तू बोल्ड अँड ब्युटीफूलमधला रिज फॉरेस्टर किंवा सांता बारबरामधल्या मेसन कैपवेल यांच्यापैकी कुणाची निवड करशील? त्यांच्यातल्या कुणाचे गुण तुला पटतात? त्यावर ऐश्वर्या राय म्हणाली की मेसन कैपवेलची निवड मी करेन कारण त्याची विनोदबुद्धी खूपच सुंदर आहे तसंच तो मला काळजी घेणारा वाटतो त्याच्यात आणि माझ्या स्वभावात अनेक गोष्टी सारख्या आहेत. यानंतर सुश्मिता सेनला विचारण्यात आलं की देशातल्या टेक्सटाइल हेरीटेजविषयी तुला काय माहीत आहे? हे किती काळापासून आहे आणि तुला परिधान करायला आवडतं का? त्यावर सुश्मिता म्हणाली, मला वाटतं की हे सारं काही महात्मा गांधींनी आणलेल्या खादीपासून सुरु झालं आहे. तेव्हापासून या सगळ्याची दीर्घ परंपरा भारतात आहे. भारतीय टेक्सटाईल हेरीटेज ही बाब अगदीच सामान्य आहे. हे दिल्याने सुश्मिताने ज्युरींची मनं जिंकली आणि मिस इंडियाच्या मुकुटावर आपलं नाव कोरलं.
ललित मोदींमुळे झाली सुश्मिताची चर्चा
सुश्मिता सेन जशी तिच्या बिनधास्त कामगिरीमुळे आणि सुंदर अभिनयामुळे चर्चेत राहिली तशीच तिच्या अफेअर्समुळेही ती चर्चेत राहिली. गेल्याच वर्षी ललित मोदींनी केलेल्या एका पोस्टमुळे सुश्मिता सेन आणि ललित मोदी हे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र त्या चर्चा नंतर फोल ठरल्या. अर्थात सुश्मिताच्या आयुष्यात बॉयफ्रेंड्सही भरपूर होते. त्यामुळे तिचं आयुष्य ढवळूनही निघालं.
सुश्मिताचे या सेलिब्रिटींसोबत होते अफेअर
विक्रम भट्ट : मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिताचे नाव सर्वप्रथम चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले. दस्तक (१९९६) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुश्मिता आणि विक्रम जवळ आले होते. काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
रणदीप हुड्डा : रणदीप हुड्डा सुश्मितासोबतच्या अफेअरमुळेही एकेकाळी चर्चेत होता. कर्मा, कन्फेशन आणि होली या चित्रपटात एकत्र काम करताना दोघे जवळ आले.
वसीम अक्रम : २०१३ मध्ये सुश्मिताचे माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत अफेअर असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र सुश्मिताने हे वृत्त फेटाळून लावले होते.
हृतिक भसीन: २०१५ च्या आसपास, सुश्मिता मुंबईतील रेस्टॉरंट मालक हृतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते.
मुदस्सर अझीझ: दिग्दर्शक मुदस्सर अझीझ हे देखील अशा लोकांपैकी एक होते ज्यांचे सुश्मिताशी अफेअर होते. सुश्मिताने दिग्दर्शक म्हणून मुदस्सरचा पहिला चित्रपट ‘दुल्हा मिल गया’मध्येही काम केले होते, जो फ्लॉप ठरला होता..
ललित मोदींशी नाव जोडलं जाण्याआधी सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्याही बऱ्याच चर्चिल्या गेल्या होत्या. मात्र अलिकडेच झालेल्या दिवाळी पार्टीत हे दोघं पुन्हा एकत्र दिसले होते. रोहमन आणि सुश्मिता दीर्घकाळ एकमेकांना डेट करत होते.
सुश्मिताचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ या दिवशी एका बंगाली कुटुंबात झाला. तिचे वडील एअर फोर्स विंग कमांडर होते. तर तिची आई शुभ्रा सेन या ज्वेलरी डिझायनर आहेत. दिल्लीत जास्त काळ राहिलेल्या सुश्मिताने एअरफोर्स गोल्ड जुबिली इंस्टिट्युटमधून पदवी घेतली आहे. पदवीचं शिक्षण घेत असतानाच ती मॉडेलिंगकडे वळली. दस्तक या सिनेमातून सुश्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
‘आर्या’ या तिच्या वेबसीरिजचीही चांगलीच चर्चा होते आहे. ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये सुश्मिताने श्रीगौरी सावंत या तृतीयपंथीयाचं पात्र साकारलं. गौरी सावंत यांनी तृतीयपंथियांसाठी केलेलं काम आणि त्यांना तृतीयपंथीय म्हणून आलेले अनुभव हे सगळं ‘ताली’ मध्ये दाखवण्यात आलं आहे. या वेबसीरिजचा युएसपी ठरली सुश्मिता सेन. तिने केलेल्या धाडसाचं कौतुक करावं लागेल. कारण आजवर एकाही अभिनेत्रीने अशा प्रकारे भूमिका करण्याची हिंमत दाखवली नव्हती. मात्र त्याचवेळी या वेबसीरिजसाठी सुश्मिता सेन या नावाला असलेलं ग्लॅमरही कुठेतरी एखाद्या शापासारखं ठरलं. प्रचंड मेहनत घेऊनही ती या सीरिजमध्ये गौरी सावंत वाटली नाही, सुश्मिता सेनच वाटली. पण हरकत नाही प्रयोग अपयशी झाला असला तरीही प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने केला होता हे विसरता येणार नाही.
सुश्मिताने सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, सनी देओल अशा दिग्गजांसह काम केलं आहे. आपण एका मध्यमवर्गीय घरातून आलो आहोत आणि आपण मॉडेलिंगकडे वळलो नसतो तर कुठे गेलो असतो हे सांगता येणार नाही असंही सुश्मिताने सांगितलं होतं. मात्र आपल्याला असं काहीतरी करायचं आहे ज्यामुळे मृत्यूनंतरही लोक त्या गोष्टीसाठी ओळखतील हे स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं असंही सुश्मिताने सांगितलं. एका सामान्य घरातून आलेली मुलगी ब्रह्मांडसुंदरी हा किताब मिळवणारी ठरली त्यातच तिच्या यशाचं आणि तिच्या मेहनतीचं गमक सामावलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.