विवेक अग्निहोत्री हे बॉलीवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी आजवर ‘काश्मीर फाईल्स’, ‘वॅक्सिन वॉर’ आणि ‘ताश्कंद फाईल्स’ यांसारख्या विविध चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे; तर विवेक अग्निहोत्री त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. बऱ्याच गोष्टींवर ते त्यांचं स्पष्ट मत मांडत असतात. अशातच ते आता पुन्हा चर्चेत आले आहेत. विवेक यांनी नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी रणबीर कपूरबद्दल भाष्य केलं आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी इंडस्ट्रीतील निर्माते, कलाकारांच्या आर्थिक मागण्यांना वैतागले आहेत आणि त्यांच्यातील प्रत्येकजण कलाकारांच्या मागे बोलत असल्याचं म्हटलं आहे. पण, त्यांच्यातील एकही जण हीच गोष्ट त्यांच्या समोर बोलू शकणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. यासह त्यांना संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित रणबीर कपूरची मख्य भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे रणबीरला टीकेचा सामना करावा लागला, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
विवेक अग्निहोत्री ‘हिंदी रश’सह संवाद साधताना प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले, “इंडस्ट्रीत कोणामध्येही रणबीर कपूरवर टीका करण्याची हिंमत नाही, कारण तो एक उत्तम कलाकार आहे. रणबीरवर टीका करणारे ते आहेत कोण.” पुढे ते म्हणाले, “मी तुम्हाला आव्हान करतो की, तुम्ही मला फक्त अशा एका दिग्दर्शकाचं किंवा निर्मात्याचं नाव सांगा, जो कलाकारांबद्दल त्यांच्या मागे काही वाईट बोलत नाही. फक्त मागे बोलणारे याबद्दल सार्वजनिक ठिकाणी कधीच बोलू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना १५० कोटी रुपयांसारखी रक्कम कलाकारांचं मानधन म्हणून मोजावी लागते.”
रणबीरबद्दल बोलायचं झालं तर तो ‘रामायण’, ‘लव्ह अँड वॉर’, ‘धुम ४’, ‘ब्रह्मास्त्र भाग २’, ‘अॅनिमल पार्क’ यांसारख्या चित्रपटांतून झळकणार आहे. याशिवाय तो राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटातही झळकणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे येणाऱ्या काळात रणबीर विविध कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, विवेक अग्निहोत्री लवकरच ‘द दिल्ली फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातं. तर या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पुनित इसर, गोविंद नामदेव, पल्लवी जोशी यांसारखे कलाकार झळकणार आहेत.