बॉलिवूडमध्ये कित्येक तरुण प्रसिद्ध अभिनेता व्हायचं स्वप्न उराशी बाळगून येतात. त्यापैकी अगदी हातावर मोजक्या लोकांनाच संधी मिळते अन् त्यातूनही एखाद दूसराच लोकप्रिय अभिनेता बनू शकतो. असाच एक फळ विकणारा १८ वर्षांचा तरुण या चित्रपटसृष्टीत आला अन् त्याने स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. चित्रपट तसेच सध्या चर्चेत असणाऱ्या ओटीटी या माध्यमावरही तो तितकाच लोकप्रिय आहे. त्याने कित्येक सुपरहीट चित्रपटात छोटी भूमिका साकारत आपलं फिल्मी करिअर घडवलं अन् स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्धही करून दाखवलं.

केवळ मनोरंजन क्षेत्रच नव्हे तर उद्योगविश्वातही त्याचा चांगलाच दबदबा आहे, कित्येक मोठमोठ्या कंपन्यांचा तो मालक आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशीही त्याचं खास नातं आहे, तो बच्चन कुटुंबाचा जावई आहे. अर्थात तो अभिनेता म्हणजे कुणाल कपूर. ‘रंग दे बसंती’ या आमिर खानच्या सुपरहीट चित्रपटातून कुणालला खरी ओळख मिळाली.

आणखी वाचा : “माझ्या मुलाच्या…” ‘पद्मावत’ला होणारा विरोध पाहून अशी होती भन्साळींच्या आईची प्रतिक्रीया; दिग्दर्शकाने सांगितली आठवण

ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक असेल की हाँगकाँगमध्ये असताना कुणाल १८ व्या वर्षापासून आंब्यांच्या निर्यातीचा व्यवसाय करायचा. सुरुवातीला त्यातून चांगले पैसेही मिळायचे पण कुणालला चित्रपटक्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं होतं. नुकतंच ‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुणालने या गोष्टींचा खुलासा केला. कुणालने ते काम सोडून पूर्णपणे चित्रपटक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला अन् सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवातही केली.

बेरी जॉन यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कुणालने रंगभूमीवर काम करताना नसीरुद्दीन शाह यांच्याकडेही अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तबूच्या ‘मीनाक्षी – अ टेल ऑफ थ्री सिटीज’ या २००४ सालच्या चित्रपटातून कुणालने या विश्वात अभिनेता म्हणून पदार्पण केले, परंतु त्याला खरी ओळख राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातूनच मिळाली. यानंतर ‘बचना ए हसीनो’, ‘डॉन २’, डियर जिंदगी’सारख्या चित्रपटातून कुणालने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

‘केटो’ या क्राऊड फंडिंगची सुरुवात कुणाल कपूरनेच केली. २०१२ साली कुणालने आपले बिझनेस पार्टनर झहीर आदेनवाला व वरुण सेठ यांच्यासह या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. कुणालची ही संकल्पना चांगलीच हीट ठरली अन् त्यांच्या या कंपनीने तब्बल १२०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. आज चित्रपटात फारसा दिसत नसला तरी कुणाल कपूर त्याचं आयुष्य थाटात जगत आहे. कुणालची एकूण संपत्ती १६६ कोटींची आहे.

View this post on Instagram

A post shared by Kunal Kapoor (@kunalkkapoor)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणालचं अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांशी एक खास नातं आहे. बिग बी यांचे बंधू अजिताभ बच्चन यांना तीन मुली आहेत नीलिमा, नम्रता व नैना. त्यापैकी नैना बच्चनबरोबर कुणाल कपूरने २०१५ साली लग्नगाठ बांधली. कुणाल हा अमिताभ बच्चन यांचा जावई आहे. कुणाल आणि नैना यांना एक मुलगाही आहे. आंब्यांची निर्यात करणाऱ्या कुणालने मनोरंजनविश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहेच, शिवाय त्याने उद्योजक म्हणूनच नाव कमावलं आहे.