Uri Fame Actress Talk’s About Career In Movies : अभिनय क्षेत्रात कलेसह सौंदर्याला, दिसण्यालाही महत्त्व असतं. विशेषकरून अभिनेत्रींच्या बाबतीत तर बऱ्याचदा त्यांना त्यांच्या दिसण्यावरून कामं दिली जातात, असं म्हटलं जातं. अशातच लोकप्रिय अभिनेत्रीनं याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे. एवढंच काय तर तिला लग्न केलं तर काम मिळणार नाही, असंही सांगण्यात आलेलं. त्याबद्दल अभिनेत्रीनं स्वत: सांगितलं आहे.
तू सुंदर नाहीस, अभिनेत्री होऊ शकत नाहीस, असं तिला सांगण्यात आलेलं. हिंदी व गुजराती चित्रपटात काम करणारी अभिनेत्री म्हणजे मानसी पारेख. मानसीने ‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना याबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली, तिला ती सुंदर दिसत नाही म्हणून अभिनेत्री होऊ शकत नाही, असं सांगण्यात आलेलं.
निर्मात्याने दिलेला लग्न न करण्याचा सल्ला
मुलाखतीमध्ये मानसी याबाबत म्हणाली, “मला तू सुंदर नाहीस. तुला कोणीही काम देणार नाही,” असं सांगण्यात आलेलं. पुढे अभिनेत्री म्हणाली, “मी लग्न करणार होते तेव्हा एका निर्मात्यानं मला सांगितलं की, “लग्न करू नकोस. जाड होशील; मग तुला कोणी काम देणार नाही. पण, माझं असं मत होतं की, लग्नानंतर मी जाड का होईन? कारण- आताही मी काम करीत आहे आणि गेल्या २० वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करतेय.”
मानसी पारेखला आठ वर्षांची एक मुलगी हे. त्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मी एक आई आहे आणि तरीही मी काम करीत आहे. त्यामुळे लोकांनी सांगितलेल्या गोष्टी योग्य आहेत की नाही मला माहीत नाही. कदाचित त्या असतीलही; पण मी मला हवं. तसेच आयुष्य जगणार आहे. मी फक्त करिअर करत राहणार नाहीये. मला आयुष्यात दोन्ही गोष्टी हव्या आहेत.”
मानसीला पुढे स्त्रियांवर समाजाकडून असा दबाव असतो की, त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवाव्या लागतात, जोपर्यंत त्या ‘स्थिर’ होत नाहीत. याबद्दल विचारण्यात आलेलं. त्यावर ती म्हणाली, “कारण- एक स्त्री म्हणून आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं, बरोबर ना? त्यामुळे आपण पूर्ण आयुष्य करिअरसाठी थांबवतो आणि जेव्हा करिअर सेट होतं, तेव्हा जाणवतं की आता उशीर झाला आहे. आता कुणासोबत जुळवून घेणं कठीण जाईल का? असं खरंच घडतं. त्यामुळे मला माझ्या बाबतीत तसं घडू द्यायचं नव्हतं.”
मानसी पारेखने गायक पार्थिव गोहिलसह लग्न केलं आहे. या दोघांना एक मुलगीसुद्धा आहे. अभिनेत्रीनं पुढे नवऱ्याचं कौतुक केलं आहे. नवऱ्याबद्दल ती म्हणाली, “मला माहीत आहे. मला योग्य जोडीदार मिळाला आहे. पार्थिवसह लग्न केल्याचं मला समाधान आहे. तोसुद्धा एक कलाकार आहे. तो मला समजून घेतो. मी लग्न केल्यानंतर माझं करिअर झालं आणि आई झाल्यानंतर माझी चित्रपाटांतील कारकीर्द सुरू झाली. त्यामुळे आता असे कोणतेही नियम नाहीयेत आणि ती एक खूप चांगली गोष्ट आहे.”
मानसी पारेखला मिळालेला सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
दरम्यान, मानसीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती एक अभिनेत्री व निर्माती आहे. तिनं हिंदी व गुजराती चित्रपटांत काम केलं आहे. मानसीनं ‘उरी’, ‘कच्छ एक्स्प्रेस’, ‘सुमित संभाल लेगा’, ‘डिअर फादर’, ‘झमकुडी’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. मानसीनं विकी कौशल, शर्मन जोशी यांसारख्या अभिनेत्यांसह काम केलं आहे. तिला ‘कच्छ एक्स्प्रेस’ चित्रपटातील कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.