Shahid Kapoor Birthday: स्पर्धा ही प्रत्येक क्षेत्रात असते. या स्पर्धेत आपलं भक्कम स्थान कसं निर्माण करायचं? मग ते स्थान कसं टिकवून ठेवायचं? हे जर अवगत झालं. तर ती व्यक्ती शेवटपर्यंत स्पर्धेत टिकून राहते. मग यादरम्यान कितीही चढ-उतार येवोत. ज्याचं ध्येय स्पर्धेत उतरून टिकून राहणं असतं त्याच्या वाट्याला यश येतंच. अशीच काहीशी गोष्ट आहे, रोमँटिक ते राऊडी हिरो असा प्रवास करणाऱ्या शाहिद कपूरची. ज्या काळात शाहरुख खान, सलमान खान व आमिर खान यांची सद्दी असताना, अक्षय कुमारने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला असताना आणि अभिनयाच्या बरोबरीने लूक व फिटनेस आघाडीवर लोकप्रिय हृतिक या सगळ्या प्रभावळीत शाहीद कपूरची एन्ट्री झाली. वडील नावाजलेले अभिनेते असूनही त्यांच्या नावाचा वापर न करता, स्वतःच्या हिंमतीवर या झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवून त्याने स्वतःला सिद्ध केलं. कधी ‘राजीव माथूर’, कधी ‘आदित्य कश्यप’ तर कधी ‘कबीर सिंग’च्या रुपात त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. एवढंच नाहीतर ‘मौजा ही मौजा’, ‘साडी के फॉल सा’, ‘गुलाबो’ ते सध्या ट्रेंड होतं असलेलं ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ अशा अनेक गाण्यांवर त्याने रसिक प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं. २० वर्षांहून अधिक काळ बॉलीवूडच्या स्पर्धेत आघाडीच्या यादीत असलेल्या शाहिदचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्याचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊ..

शाहिद कपूरचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ साली झाला. शाहिद तीन/चार वर्षांचाच असताना वडील पंकज कपूर व आई नीलिमा अजीम विभक्त झाले. पंकज कपूर हे पुढील करिअरसाठी मुंबईत स्थायिक झाले. शाहिद हा आईसह दिल्लीत राहत होता. त्याची आई देखील अभिनेत्री व नृत्यांगना होती. आई-वडील विभक्त झाल्यानंतर शाहिद दिल्लीच्या ज्ञानभारती शाळेत शिकला. यावेळी त्याला वडिलांच्या जागी आजोबांची साथ होती. त्याच्या आजोबांनी वडिलांची उणीव कधी भासू दिली नाही. पण वडील (पंकज कपूर) शाहिदच्या वाढदिवसाला नेहमी त्याला भेटायला येत असत. काही काळानंतर अभिनेता १० वर्षांचा असताना नीलिमा अजीम करिअरच्या कारणास्तव त्याला घेऊन मुंबईत स्थायिक झाल्या. त्यामुळे शाहिदचं पुढील शिक्षण राजहंस विद्यालयात झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण मिठीबाई कॉलेजमध्ये झालं. बालपणापासून शाहिदला नृत्याची आवड. त्यामुळे तो शाळेत, कॉलेजमधील कार्यक्रमात नेहमी सहभाग घेत असे. पुढे त्याने शामक डावरच्या प्रसिद्ध डान्स अकादमीमध्ये त्याने नृत्याचे धडे घेतले.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव

कधी करिश्मा, ऐश्वर्याच्या मागे केला डान्स, तर कधी सहाय्यक दिग्दर्शकांचं केलं काम

त्या काळात शाहिदची परिस्थिती बेताची होती. जेवणासाठी, ऑडिशनसाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. त्यामुळे त्याने शामक डावरच्या डान्स अकादमीमध्ये नृत्याचे धडे इतरांना द्यायला सुरुवात केली. एवढंच नाहीतर तो बॅकग्राऊंड डान्सरचं काम करायलाही लाजला नाही. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरच्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटात त्याने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं. तसंच १९९९ सालच्या ‘ताल’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या मागे त्याने डान्स केला. यानंतर शाहिदने जाहिरातींमध्ये काम करायला सुरुवात केली. या काळात त्याने अनेक जाहिराती केल्या. शिवाय म्युझिक व्हिडीओमध्ये तो झळकू लागला.

फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

हेही वाचा – वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट

शाहिदने आपल्या कामामध्ये सातत्य ठेवलं. जे काही वाट्याला येईल त्याची जबाबदारी त्याने स्वीकारली. १९९८ साली त्याने वडिलांच्या ‘मोहनदास बीएएलएलबी’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं. या संघर्षाच्या काळात शाहिदने अनेक ऑडिशन दिल्या. पण त्याला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नाकारलं जातं होतं. केन घोष यांनी शाहिदला एकाच्या चित्रपटात घेण्याचं निश्चित केलं होतं. पण ऐनवेळा अभिनेत्याला नाकारण्यात आलं. मात्र असं असलं तरी शाहिदने मनाशी एक गोष्ट पक्की केली होती. ती म्हणजे पहिला चित्रपट हा केन घोष यांच्यासह करणार. यावेळी अभिनेत्याला एका दुसऱ्या चित्रपटाची ऑफर आली होती. पण त्याने ती नाकारली आणि अखेर तो दिवस उजाडला. केन घोष यांनी शाहिदला ‘इश्क-विश्क’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

‘असा’ झाला रोमँटिक हिरो

२००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘इश्क-विश्क’ या चित्रपटाने शाहिदचं नशीब पालटलं. त्याने साकारलेला राजीव माथूर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. गोरापान, देखणा असा शाहिद चॉकलेट बॉय म्हणून नावारुपाला येऊ लागला. ‘इश्क-विश्क’ या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पण यानंतर शाहिदचा ग्राफ खाली घसरला. ‘फिदा’, ‘दिल मांगे मोर’, ‘दिवाने हुए पागल’, ‘वाह! लाइफ हो तो ऐसी!’ या शाहिदच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे त्याच्या या चित्रपटांवर फ्लॉपचा शिक्का बसला. मात्र यानंतर शाहिदच्या वाट्याला पुन्हा यश आलं. २००६मध्ये प्रदर्शित झालेला ‘विवाह’, २००७मध्ये प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’, २००९मध्ये प्रदर्शित झालेला ‘कमीने’ हे चित्रपट त्याचे सुपरहिट ठरले. या चित्रपटांमुळे चॉकलेट बॉय, रोमँटिक हिरो म्हणून शाहिद अधिक प्रसिद्ध झाला.

फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

सुपरहिट ठरलेल्या ‘जब वी मेट’ चित्रपटासाठी शाहिद व करीना ही पहिली पसंती नव्हती. याआधी ‘आदित्य’च्या भूमिकेसाठी बॉबी देओल व ‘गीत’च्या भूमिकेसाठी प्रीती झिंटाला विचारण्यात आलं होतं. एवढंच नाहीतर करार देखील झाले होते. पण त्यानंतर शाहिद व करीनाचा विचार करण्यात आला. करीना इम्जियाज अली यांचा या चित्रपटाबाबत थोडी साशंक होती. पण अभिनेत्याने समजूत काढल्यानंतर करीनाने होकार दिला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १०० दिवस धुमाकूळ घातला. शाहिदने साकारलेला ‘आदित्य’ व करीनाने साकालेली ‘गीत’च्या प्रेमात तरुणाई वेडी झाली. या चित्रपटातील ‘ये इश्क हाय…’ या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सरोज खान यांनी कोरियोग्राफ केलेल्या या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अजूनही या चित्रपटाचं वेड कायम आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील सीन्स, गाणी सतत व्हायरल होतं असतात.

दरम्यान, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘रंगून’, ‘पद्मावत’, ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील शाहिदच्या भूमिकेने सिद्ध केलं की, तो कुठल्याही भूमिका उत्तमरित्या साकारून त्याला न्याय देऊ शकतो. अलीकडेच प्रदर्शित झालेला आणि सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबोला सुरू असलेल्या ‘तेरी बातों में उलझा जिया’मधील शाहिदचा आर्यन अग्निहोत्री प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. त्यामुळे प्रेक्षकही या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देताना दिसत आहेत.

अफेअर अन् लग्न

शाहिदच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं, तर आजवरच्या प्रवासात त्याचं नाव अनेक अभिनेत्रीशी जोडलं गेलं. पण करीना कपूर व प्रियांका चोप्राची असलेलं नातं अधिक चर्चेत राहिलं. करीना ‘कॉफी विथ करण शो’मध्ये शाहिदबरोबर असलेल्या नात्याविषयी खुलेपणाने बोलली होती. तिने स्वतः अभिनेत्याला प्रपोज केलं होतं. दोन महिने त्याच्या मागे लागली होती. सतत मेसेज, फोन करत होती. पण शाहिदने तिला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. मात्र अखेर अभिनेत्याने होकार दिला, असं करीनाने सांगितलं होतं. इतकंच नव्हेतर शाहिदचे करीनाच्या कुटुंबियांशी चांगले संबंध होते. रणधीर कपूर त्याला ‘डोडो’ असं म्हणायचे. पण शाहिद-करीनाचं हे नातं कालांतराने संपुष्टात आलं. करीनाने सैफ अली खानशी लग्न केलं. पण त्यानंतर शाहिदचं नाव प्रियांका चोप्राबरोबर जोडलं गेलं. एकेदिवशी प्रियांकाच्या घरी आयकर विभाग छाप टाकण्यासाठी गेले होते, तेव्हा शाहिद कपूरने दार उघडलं होतं. पण अभिनेत्याचं प्रियांकाशी असलेलं नातं देखील जास्त काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्याने २०१५मध्ये दिल्लीच्या मीरा राजपूतशी लग्न केलं. मीरा ही शाहिदपेक्षा वयाने १३ वर्षांनी लहान आहे. आता दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं नाव मीशा असून मुलाचं नाव जैन आहे.

फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

हेही वाचा – अभिनयासाठी घर सोडलं, पंजाब ते बॉलीवूडपर्यंत ‘असा’ होता शहनाझ गिलचा प्रवास

दरम्यान, एकाच पठडीच्या भूमिकेत काम न करता विविधांगी भूमिका साकारणाऱ्या, कितीही फ्लॉप चित्रपट झाले तरीही न डगमगता पुन्हा आव्हानात्मक काम स्वीकारून बॉलीवूडच्या स्पर्धेत टिकून असणाऱ्या शाहिदला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.