कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात सध्या कतरिना खूप व्यग्र आहे. तिच्यासह विकी कौशलही या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. हॅलोविनच्या निमित्ताने कतरिना ‘सुसाइड स्क्वाड’ या चित्रपटातील हार्ली क्वीन या पात्रासारखा वेश केला होता. यासाठी तयार होताना विकी तिला मदतही करताना दिसला. हॉरर कॉमेडी शैलीमधला हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने संपूर्ण टीमचे कौतुक केले. पुढे त्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये ‘फोन भूत’ पाहण्याचे आवाहन केले.
अभिनेता विकी कौशल ‘सॅम बहादूर’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईबाहेर होता. काही दिवसांपूर्वी तो घरी परतला. यंदाची दिवाळी विकी आणि कतरिना यांनी मिळून साजरी केली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याने दोघांचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. विकी सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकताच विकीने त्याच्या आई, वीणा कौशल यांच्याबरोबरचा व्हिडीओ इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या विकीच्या डोक्यावर तेलाने मालिश करत असल्याचे दिसते. मालिश करवून घेत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे.
त्याने या व्हिडीओला हृतिक रोशनच्या ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटामधील ‘तू है’ हे गाणं जोडलं आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. तुझा मार आणि मालिश या दोन्हींमध्ये शांतता आहे”, असे कॅप्शन त्याने व्हिडीओला दिले आहे. त्याच्या असंख्य चाहत्यांनी व्हिडीओखाली कमेंट्स केल्या आहेत. कतरिनासह नेहा धूपिया, मुकेश छाब्रा अशा अनेक सेलिब्रिटींनी वीणा कौशल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – “महेश मांजरेकर दबंग आहेत त्यांनी…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
एका मुलाखतीमध्ये विकीने त्याने मिळवलेल्या यशाचे श्रेय वीणा यांना दिले होते. फिल्म कम्पॅनिअनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तो म्हणाला होता, “प्रसिद्धी मिळवून सुद्धा विनम्र कसे राहावे हे मी माझ्या आईने शिकलो आहे. माझ्यामध्ये होणारे बदल ती सतत पाहत असते. एकदा ती पेपरवर काहीतरी लिहित होती. मी तिच्यासमोर होतो. माझ्याकडे पाहून ती तू ठिक आहेस. स्टार बनला आहेस असं म्हणाली. तेव्हा तिने नकळत माझ्यात झालेल्या बदलांची जाणीव मला करुन दिली.”