दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी बॉलीवूडमधील अनेकांबाबत मत व्यक्त केलं आहे. नुकतंच त्यांनी लेखक, दिग्दर्शक अनुराग कश्यपबद्दलही भाष्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यांची चर्चा होताना दिसली. अशातच आता त्यांनी या मुलाखतीमध्ये बॉलीवूडमधील इतर दिग्दर्शक व कलाकारांबद्दल मत व्यक्त केलं आहे.
‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलीवूडमध्ये सगळेच त्यांच्या अजेंडानुसार चित्रपट बनवीत असल्याचं म्हटलं आहे. “करण जोहर, विधू विनोद चोप्रा या सगळ्यांचाही काही ना काही अजेंडा आहेच. “माझाही चित्रपट बनविण्यामागे विशिष्ट अजेंडा आहे”. जसं करण जोहर त्याच्या अनेक चित्रपटांमधून म्हणतो कुटुंब हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, यश चोप्रा प्रेम सर्वस्व असल्याचं सांगायचे हासुद्धा एक अजेंडाच झाला. पुढे त्यांनी, “करण जोहरबरोबर माझं काही बिनसलेलं नाही. तो एक चांगला माणूस आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये फॅशनला जास्त महत्त्व दिलं जातं. तर हासुद्धा त्याचा अजेंडाच आहे”, असं म्हटलं आहे
पुढे याबाबत बोलताना ते म्हणाले, “प्रत्येकाचा काहीतरी अजेंडा असतो. जेव्हा विधू विनोद चोप्रा यांनी २०२० साली ‘शिकारी’ हा चित्रपट बनवला तेव्हा ते म्हणाले, “कश्मिरी पंडितांबरोबर जे काही झालं, ते आपण सगळ्यांनी विसरायला हवं, आणि एकमेकांना मिठी मारून माफ करायला हव”. तो त्यांचा अजेंडा होता. त्यामुळे प्रत्येकाचा अजेंडा असतोच. याबाबत बोलताना ते सलमान खानचा उल्लेख करीत म्हणाले, “सलमान खान ईदच्या वेळी चित्रपट प्रदर्शित करतो यामागे त्याचाही अजेंडा आहेच.”
विवेक अग्निहोत्री यांनी याच मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपबद्दलही मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर अनुरागनंही त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. विवेक अग्निहोत्री अनुरागबद्दल बोलताना म्हणाले, “‘धन धना धन गोल’ चित्रपटाच्या वेळी अनुराग मद्यपान करीत असे आणि त्याच्याबरोबर काम करणं अवघड झालं होतं.” त्यानंतर अनुरागनं इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत म्हटलं होतं, “हा किती खोटा माणूस आहे. त्यालाच फुटबॉलवर आधारित ‘लगान’सारखा चित्रपट बनवायचा होता. त्यामुळे त्यानं त्याच्या माणसाकडून चित्रपटाची कथा लिहून घेतली. या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये झालं होतं आणि तेव्हा मी भारतात होतो.”
दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आजवर, ‘द व्हॅक्सिन वॉर’, ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द ताश्कंद फाइल्स’, ‘धन धना धन गोल’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.