Vivek Oberoi’s Dubai Home : विवेक ओबेरॉय बॉलीवूडचा असा एक अभिनेता ज्याला त्याच्या २२ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. २००२ मध्ये त्याने मनोरंजनविश्वात पदार्पण केलं होतं. मात्र, चित्रपटसृष्टीत फारसं यश मिळालं नसलं, तरीही आजच्या घडीला विवेक ओबेरॉय कोट्यवधींचा मालक आहे.
विवेक आजच्या घडीला यशस्वी बिझनेसमन आहे. काही वर्षांपूर्वीच तो मुंबई सोडून दुबईला शिफ्ट झाला. दुबईत तो आपल्या कुटुंबीयांसह आलिशान बंगल्यात राहतो. स्विमिंग पूल, फुटबॉल कोर्ट, घराच्या अवतीभोवती सुंदर बाग, बागेत झोपाळा, विविध प्रकारची झाडं, मॉडर्न इंटिरिअर अशा सगळ्या सुखसुविधांनी परिपूर्ण असं विवेकचं दुबईतील घर आहे. या घराची झलक विवेकने ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत दाखवली आहे.
विवेक म्हणाला, “हे घर डिझाइन करण्याचं संपूर्ण श्रेय मी माझी पत्नी प्रियांकाला देतो. लोकेशन सुद्धा तिनेच सिलेक्ट केलं होतं. मी फक्त दुबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं होतं. खरंतर, तेव्हा वेगळ्या शहराची निवड केली होती पण, प्रियांकाला हे मेडोज शहर आवडलं. ऑफिस, बिझनेसच्या दृष्टीकोनातून आम्ही इथे शिफ्ट झालो. पण, अजूनही मुंबई हे शहर माझ्या खूप जवळचं आहे. मी मुंबईत येऊन-जाऊन असतो.”
अभिनेता पुढे म्हणाला, “आमच्या घराच्या आजूबाजूला असंख्य झाडं आहेत. विशेषत: गुलमोहरचं झाड पाहून मला माझ्या जुहूच्या घराची आठवण येते. आमच्या बागेत आम्ही कढीपत्ता सुद्धा लावला आहे. माझ्या बायकोची इच्छा होती की, दुबईत घर घेतल्यावर आजूबाजूला हिरवीगार झाडं, पहाटे उठल्यावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यावा, बाजूला तलाव वगैरे पाहिजे आणि ते म्हणतात नेहमी बायकोचं ऐकावं… ‘वाइफ इज अलवेज राइट’ तसंच माझ्या बाबतीत झालं आणि हे सुंदर घर तिने डिझाइन केलं.”
“मी दुबईत आल्यापासून जास्तीत जास्त शांतपणे जीवन कसं जगता येईल याचा प्रयत्न करतोय. घरी वेळेत येणं, माझ्या मुलांबरोबर खेळणं, पहाटे लवकर उठून पक्ष्यांना दाणे खायला देणं, जवळच असलेल्या तलावाभोवती फेरफटका मारायला जाणं हे असं माझं आयुष्य सध्या सुरू आहे. हे सगळं मी भारतात कधीच अनुभवलं नव्हतं, कारण तिथे अनेक लोक मला ओळखत होते त्यामुळे साहजिक असं सहज कुठेही फिरता येत नाही.” असं विवेकने सांगितलं.
विवेक ओबेरॉय त्याच्या बिझनेसबद्दल म्हणाला, “भारतात मी फिनटेक कंपनी सुरू केली. या कंपनीमार्फत जवळपास ४५ लाख मुलांना शिक्षणासाठी कर्ज मिळवून देण्यास मदत करता आली. यानंतर मी आयस्कोलर कंपनीची सुरुवात केली, आता हा एक कृषी क्षेत्रातील स्टार्टअप आहे. या माध्यमातून ९७ लाख शेतकऱ्यांना मदत केली जाते. दुबईत मी बीएमडब्ल्यू डेव्हलपमेंट्स कंपनी सांभाळतो, यामार्फत अल्ट्रा-लक्झरी रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स सांभाळले जातात. याशिवाय सहा देशांमध्ये आणि विविध ३५ शहरांमध्ये सॉलिटारियो हा डायमंड ज्वेलरी ब्रँड देखील मी लॉन्च केला आहे.”
“आता दुबईत आल्यापासून एकदा घरी आलो की, फोन बाजूला ठेवून माझ्या कुटुंबासह मी वेळ घालवतो. रात्री जेवणाआधी मुलाबरोबर टेबिल टेनिस आवर्जून खेळतो. तो आता ११ वर्षांचा आहे. त्याच्या चेहऱ्यावर “मी बाबाला गेममध्ये हरवलं…” हा आनंद मला कायम दिसला पाहिजे.” असं विवेक ओबेरॉयने सांगितलं.