Warner Bros Teams Up With Bhanushali Studios: वॉर्नर ब्रदर्स डॉट या अमेरिकन कंपनीने भानुशाली स्टुडिओज लिमिटेडबरोबर पाच चित्रपटांसाठी करार केला आहे. या कराराद्वारे पाच हॉलीवूडमधील चित्रपटांवर आधारित बॉलीवूडमध्ये पाच चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. भानुशाली स्टुडिओज लिमिटेड कंपनीने याआधी ‘सिर्फ एक बंदा काफी है’, ‘भैय्या जी’ अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे.
वॉर्नर ब्रदर्स आणि भानुशाली स्टुडिओजमध्ये मोठा करार
व्हरायटी डॉट कॉमनुसार, हॉलीवूड चित्रपट भारतीय सांस्कृतिक दृष्टिकोनातून बॉलीवूडमध्ये तयार करणे, तसेच हे चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचवणे हे वॉर्नर ब्रदर्स आणि भानुशाली स्टुडिओज लिमिटेड यांच्यात झालेल्या कराराचे उद्दिष्ट आहे.
या कराराबद्दल वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सचे भारतातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डेंजिल डायस म्हणाले, “भारत हा जगातील अत्याधुनिक चित्रपट बाजारपेठांपैकी एक आहे. त्यामुळे आम्ही या चित्रपटांतून भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. या कराराद्वारे आम्हाला असे चित्रपट तयार करता येतील जे भारतीय प्रेक्षकांना आवडतील.”
भानुशाली स्टुडिओज लिमिटेडबरोबरच कंपनीने जेओएटी फिल्म्स (JOAT) या कंपनीबरोबरदेखील करार केला आहे. जेओएटी फिल्म्सचे जॅक गुयेन यांच्याकडे ३० वर्षांचा अनुभव आहे. जेओएटी फिल्म्स ‘द इंटर्न’च्या कोरियन रिमेकवर काम करणार आहे. याबद्दल जॅक गुयेन म्हणाले वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सबरोबर काम करण्यासाठी तसेच बीएसएलबरोबर भागीदारी करण्यास उत्सुक आहे.
भानुशाली स्टुडिओबद्दल बोलायचे तर या स्टुडिओने अनेक लोकप्रिय चित्रपट व वेब सीरीजची निर्मिती केली आहे. यामध्ये ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. या स्टुडिओने काही दिवसांपूर्वीच हंसल मेहता यांच्या ट्रू स्टोरी फिल्म्सबरोबर तीन चित्रपटांसाठी करार केला होता. ‘जनहित में जारी’, ‘मैं अटल हूं’, ‘कोस्टाओ’ या चित्रपटांचा समावेश आहे.
वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट कंपनीला वॉर्नर ब्रदर्स म्हणून ओळखले जाते. वॉर्नर ब्रदर्स हा एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन स्टुडिओ आहे. १९२३ रोजी वॉर्नर बंधूंनी ही कंपनी स्थापन केली होती. विशेष म्हणजे ही कंपनी प्रमुख अमेरिकन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे. चित्रपट निर्मिती तसेच इतर मनोरंजन क्षेत्रातील विविध कामांसाठी ही कंपनी ओळखली जाते. या कंपनीने हॅरी पॉटरसारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे.
दरम्यान, आता हॉलीवूडचे कोणते पाच चित्रपट बॉलीवूडमध्ये पाहता येणार, हे पाहणे महत्वाचे आहे.