वडील यशस्वी अभिनेते असतील तर त्यांच्याइतकं यश मिळवणं प्रत्येक स्टारकिडला जमेलच असं नाही. पण दिग्गज धर्मेंद्र यांचा वारसा सनी देओलने यशस्वीरित्या पुढे नेला. सनीने १९८३ मधील हिट चित्रपट ‘बेताब’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सनीला त्याच्या वडिलांनी या प्रवासात मार्गदर्शन केलं आणि पाठिंबा दिला. पण एकदा धर्मेंद्र सनीच्या कामावर खूश नव्हते त्यामुळे त्यांनी त्याला सिनेमाचं पुन्हा डबिंग करायला सांगितलं होतं.

द आरकेबी शोमध्ये धर्मेंद्र यांनी स्वतः हा किस्सा सांगितला होता. “मी त्याचा पहिला चित्रपट ‘बेताब’चा ट्रायल शो पाहिला, त्यावेळी डबिंग पूर्ण झालं होतं. ट्रायल शो पाहिल्यानंतर मला खूप राग आला. मी घरी आलो आणि विचारलं ‘कहां है सनी साहेब? निकालो उसे (सनी कुठे आहे? त्याला बाहेर आणा).’ मी त्याला सोबत घेऊन पूर्ण डबिंग पुन्हा करायला लावलं होतं. तो डबिंग करताना खूप थकायचा,” असं धर्मेंद्र म्हणाले होते.

धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या काळातील स्वतःचा अनुभवही सांगितला होता. “मला माझं पहिलं डबिंग आठवतं. मी माझा शर्ट फाडला होता, कारण मी विचार करत होतो की, ‘कॅमेरासमोर अभिनय केल्यानंतर मला हे डबिंग का करावं लागतंय?’ डबिंगमध्ये, त्याच भावना येत नाहीत. जोपर्यंत तुम्ही जीव ओतून करत नाही तोपर्यंत, डबिंग करणं कठीण आहे,” असं धर्मेंद्र म्हणाले होते.

सनीला पुन्हा डबिंग करायला लावलं तेव्हा रात्री उशिरापर्यंत धर्मेंद्र त्याच्याबरोबर थांबायचे. “बेताबचं डबिंग सुरू असताना रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत मी त्याच्याबरोबर राहायचो. कधीकधी, मी घरी गेलोय असं नाटक करायचो आणि लपून सनीचं काम बघायचो. तो टेक्निशियनला ‘बाकीचं उद्या करू’ असं म्हणायचा, ते मी ऐकत असायचो,” असं धर्मेंद्र म्हणाले होते.

धर्मेंद्र यांनी सनीच्या कानशिलात लगावली होती

धर्मेंद्र यांनी ‘बेताब’ चित्रपटाचे डबिंग पुन्हा करायला लावले तेव्हा कसं वाटलं होतं? असं सनीला विचारण्यात आलं होतं. “मला पुन्हा शाळेत गेल्यासारखं आणि मुख्याध्यापक तिथे बसल्यासारखं वाटत होतं,” असं तो म्हणाला होता. मग धर्मेंद्र म्हणाले, “मी त्याच्याशी खूप चांगलं वागलो होतो. माझ्या वडिलांनी तर सनी लहान असतानाही मला कानाखाली मारली होती.”

दुसरीकडे त्यांनी सनीला मारल्याचा किस्सा सांगितला होता. “मी सनीला एकदा कानाखाली मारली होती. त्यावेळी तो लहान होता. मी त्याला खेळण्यातली बंदूक आणून दिली होती आणि त्याने शेजारच्या घराच्या सर्व खिडक्या फोडल्या होत्या. मी त्याला फक्त तेव्हाच मारलं होतं. पण नंतर मी शूटिंगला गेल्यावर सनीबद्दल विचारण्यासाठी सतत घरी फोन करत होतो,” असं धर्मेंद्र म्हणाले होते. “जेव्हा बाबांनी मला मारलं तेव्हा माझ्या चेहऱ्यावर त्यांच्या दोन बोटांचे व्रण उमटले होते,” असं सनीने सांगितलं होतं.