Chunky Pandey compared with Amitabh Bachchan: अभिनेते चंकी पांडे यांनी ‘आग ही आग’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘तेजाब’, ‘पाप की दुनिया’ या चित्रपटातून चंकी पांडे यांना मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, त्यांच्या कारकिर्दीत असा एक टप्पा होता, ज्यावेळी त्यांना काम मिळत नव्हते.
चंकी पांडे यांना महत्त्वाच्या भूमिका मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. यादरम्यानच त्यांनी त्यांची व अमिताभ बच्चन यांची विनोदी पद्धतीने तुलना केली होती. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर तुलना करताना चंकी पांडे म्हणाले होते, “ते काम करत नाहीत आणि मला काम मिळत नाही.”
मी केलेल्या विनोदाचे…
‘लेहेरेन’ला दिलेल्या एका मुलाखतीत चंकी पांडे यांनी त्यांनी केलेल्या विनोदाबाबत म्हणाले होते, “मी इतर कलाकारांवर खूप विनोद करतो, त्यामुळे मी विचार केला की मी स्वत:वरदेखील विनोद केला पाहिजे. मी अमितजींचा मोठा चाहता आहे. मी केलेल्या विनोदाचे त्यांना वाईट वाटले नसणार अशी मी आशा करतो; कारण मी त्यांच्यावर नाही तर माझ्यावर विनोद केला.
याबाबत अधिक बोलताना चंकी पांडे म्हणाले होते, “मी जेव्हा असे म्हटले होते की मला काम मिळत नाही, त्यावेळी माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की मला जसे पाहिजे तसे काम मिळत नाहीये. तसे तर मला दररोज दोन चित्रपटांच्या ऑफर येतात, पण मला त्या पद्धतीचे काम करायचे नसते. सी-ग्रेड चित्रपटांचे असे असते की जिथे निर्माता कोण आहे, चित्रपट कधी तयार होणार, दिग्दर्शक कोण आहे या सगळ्या गोष्टी माहीत नसतात. मी असे चार-पाच चित्रपट केले आहेत. मला त्या चुका परत करायच्या नाहीत, त्यामुळे मी काम करत नाही याचा अर्थ मला काम करायचे नाही; त्यामुळे अमिताभ बच्चन व माझी स्थिती सारखीच आहे.
चंकी पांडे असेही म्हणाले की, मला आजपर्यंत कोणीही असे म्हणाले नाही की चंकी वाईट अभिनेता आहे. मी कधी कधी ३२ रिटेक घेतले आहेत, पण मी कायम सुधारणा केल्या आहेत. बॉलीवूडमधील कोणत्याही कलाकाराने असे कधीही म्हटले नाही, त्यांनी नेहमी हेच म्हटले, मी सुधारणा करत आहे.
हिरो आणि कॅरेक्टर हिरो यांच्यात काय फरक असतो यावर चंकी पांड्ये म्हणालेले, “जेव्हा चित्रपटात नायकाचे पात्र असते तेव्हा तुम्हाला अभिनय करताना मर्यादा असतात, कारण नायक हा चांगलाच असतो. तो न्यायासाठी, आई-बहिणीसाठी लढतो. त्याच प्रक्रियेत नायक अडकतो. पण, जेव्हा तुम्ही कॅरेक्टर रोल साकारता, जसा मी तेजाबमध्ये केला होता. त्यावेळी तुम्हाला करण्यासाठी खूप गोष्टी असतात. विविध गोष्टी तुम्ही एका भूमिकेतून करू शकता.”