हिंदी चित्रपटसृष्टीत कोणाचाही पाठिंबा नसताना स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं आणि प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य करणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. बॉलिवूडमधील अभिनेत्रींसाठी तर हे अधिक कठीण असतं. महिला केंद्रस्थानी असणारे चित्रपट सध्या बनत असले तरी त्यांची संख्या फार कमी आहे. बऱ्याचदा मुख्य प्रवाहातील चित्रपटात नायक हाच केंद्रस्थानी असतो अन् नायिकेची भूमिका ही यथातथाच असतात. याच गोष्टींना छेद देत काही अभिनेत्रींनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यात यश आलं. त्यापैकीच एक गुणी अभिनेत्री म्हणजे क्रीती सेनॉन.

क्रीती सेनॉन ही गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. एकापाठोपाठ एक क्रीतीने बिग बजेट आणि सुपरहीट असे चित्रपट दिले आहेत. ‘दिलवाले’, ‘मीमी’, ‘भेडीया’, ‘बच्चन पांडे’, ‘गणपत’, ‘शहजादा’ अशा बिग बजेट चित्रपटात क्रीती टॉपच्या स्टार्सबरोबर झळकली तर ‘मीमी’सारख्या चित्रपटातून तिच्या अदाकारीचीही खूप प्रशंसा झाली. आज कित्येक तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या क्रीतीलादेखील याआधी अत्यंत खडतर दिवस पहावे लागले होते. तब्बल १५ महीने क्रीतीकडे कोणतेही काम नव्हते, या स्ट्रगलबद्दल नुकतंच क्रीतीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “शॉर्ट कपडे वापरायला परवानगी नव्हती”, पतीपासून विभक्त होण्यापूर्वीच ईशा देओलने सासरच्यांबद्दल केलेला खुलासा

नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रीती म्हणाली, “माझ्या फिल्मी करिअरमध्ये अशी फार कमी वेळ आली आहे जेव्हा माझं करिअर अगदी शिखरावर आहे. जेव्हा जेव्हा असं झालंय तेव्हा तेव्हा माझ्यासमोर नव्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. मला असं बऱ्याचदा वाटायचं की मी आणखीन उत्तम काम करू शकते पण माझ्याकडे तशी संधीच नव्हती. जेव्हा तुमची कुवत असूनही केवळ आपल्या हातात काही गोष्टी नसल्याने ती संधी दुसऱ्या व्यक्तीला मिळते तेव्हा मात्र खूप दुःख होतं.”

पुढे क्रीती म्हणाली, “अगदी खरं सांगायचं झालं तर ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटानंतर माझ्याकडे १५ महीने काहीही काम नव्हते. चित्रपट तयार झाला, प्रदर्शित झाला अन् त्यानंतरही तब्बल १५ महीने मी कोणताही चित्रपट केला नव्हता. हे असं माझ्या बाबतीतच का घडतंय असं मला सतत वाटायचं. मी हरतऱ्हेचे प्रयत्न केले पण शेवटी माझ्या हाती काहीच लागलं नाही.”

View this post on Instagram

A post shared by Kriti Sanon ? (@kritisanon)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बरेली की बर्फी’नंतर तब्बल दोन वर्षांनी ‘लुका छुपी’ हा क्रीतीचा चित्रपट सुपरहीट ठरला. यामध्ये क्रीतीसह कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १२८ कोटींचा व्यवसाय केला. सध्या क्रीती तिच्या आगामी ‘तेरी बातों में ऐसा उलझा जीया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये क्रीती एका रोबोटच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील तिच्या हॉट आणि बोल्ड लूकची जबरदस्त चर्चा आहे. या चित्रपटात क्रीती सेनॉन व शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. ९ फेब्रुवारीपासून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.