Who will inherit Sunjay Kapoor’s Wealth: अभिनेत्री करिश्मा कपूरचा माजी पती, प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूरचं गुरुवारी (१२ जून) रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. आवडता पोलो खेळ खेळत असताना तो अचानक खाली कोसळला. संजय कपूरच्या अकाली मृत्यूमुळे व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला. तसाच सोना कॉमस्टार कंपनीसमोरही संकट उभे राहिले आहे. कंपनीचा उत्तराधिकारी आणि वारसा हक्कांबाबत विविध अटकळ बांधली जात आहेत. त्यातच संजय कपूरच्या मृत्यूनंतर सोना कॉमस्टार कंपनीच्या शेअर्समध्ये काहीशी घसरण झाली आहे.
संजय कपूरचं उद्योगविश्व
२०१५ साली संजय कपूरचे वडील सुरिंदर कपूर यांच्या निधनानंतर सोना कॉमस्टर या कंपनीची धुरा त्यांच्या हातात आली. कंपनीला नवी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ब्लूमबर्गच्या मते, सोना कॉमस्टार कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ३१ हजार कोटी (४ अब्ज डॉलर्स) इतके आहे. बिझनेस टुडे संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, गुरुवारी संजय कपूरच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर शुक्रवारी बाजार उघडताच सोना कॉमस्टारच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
कंपनीतील संजय कपूरची जागा कोण घेणार?
संजय कपूर यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर सोना कॉमस्टारने निवेदन प्रसिद्ध करत शोक व्यक्त केला. या निवेदनात म्हटले की, “त्यांची दूरदृष्टी, व्यावसायिक मूल्ये आणि उत्कृष्टतेसाठीचा त्यांचा ध्यास हा आमच्यासाठी वारसा आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना, व्यावसायिक भागीदारांना, कर्मचाऱ्यांना आणि शेअर्स होल्डर्सना विश्वास देऊ इच्छितो की, त्यांच्या वारशाचा आदर करत आम्ही कंपनीचे काम नित्यनेमाने सुरू ठेऊ.” तसेच सर्व गुंतवणूकदारांनाही कंपनीने सर्व काही सुरळीत हाताळले जाईल, असा विश्वास दिला आहे.
संजयला एकूण तीन मुले आहेत. दुसरी पत्नी करिश्मा कपूरकडून समायरा (२०) आणि किआन (१४) अशी दोन मुले आहेत. हे दोघेही अद्याप कंपनीचा भाग नाहीत. तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्याकडून अझारियास हा ६ वर्षांचा मुलगा आहे. तीनही मुलांपैकी कुणीही सध्या कंपनीची सूत्रे हाती घेण्याची शक्यता नाही, असे वृत्त हिंदुस्तान टाइम्स संकेतस्थळाने दिले आहे.
इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, संजय कपूरची बहीण कंपनीच्या संचालक मंडळात प्रवेश करू शकतात. सध्याचे संचालक मंडळ आपल्या अधिकाराचा वापर करत कंपनीचा नित्य व्यवहार सांभाळत आहे.
१०,३०० कोटी रुपयांची वैयक्तिक संपत्ती कुणाला मिळणार?
फोर्ब्सने म्हटले आहे की, संजय कपूरच्या मृत्यूवेळी त्याची वैयक्तिक संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (१०,३०० कोटी) इतकी होती. फोर्ब्सच्या माहितीनुसार, २०२२ आणि २०२४ साली त्यांची वैयक्तिक संपत्ती सर्वाधिक १.६ अब्जावर पोहोचली होती. कायद्यानुसार त्यांच्या संपत्ती आणि मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याचे अधिकार विद्यमान पत्नी प्रिया सचदेव यांच्याकडे जाते. तसेच वारसा नियोजनाचा भाग म्हणून संजयने करीष्मा कपूरच्या दोन्ही मुलांना १४ कोटी रुपयांचे बाँड भेट दिले होते. यातून त्यांच्यासाठी प्रत्येकी १० लाखांचे मासिक उत्पन्न निश्चित केलेले आहे.
५३ वर्षीय संजय कपूरचे पहिले लग्न १९९६ साली फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट नंदिता महतानीशी झाले होते. चारच वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००३ साली संजय कूपरचा विवाह अभिनेत्री करिश्मा कपूरशी झाला. २०१६ साली करिश्माशी घटस्फोट झाल्यानंतर त्याने २०१७ साली प्रिया सचदेवशी लग्नगाठ बांधली.