नेटफ्लिक्सवर बॅड्स ऑफ बॉलिवूड ही आर्यन खान दिग्दर्शित वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. या विरोधात समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खान आणि शाहरुख खानच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट प्रा. लि. च्या विरोधात समीर वानखेडे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. रेड चिलीज ही कंपनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीची आहे. आपण जाणून घेऊ कोण आहेत समीर वानखेडे?
कोण आहेत समीर वानखेडे?
समीर वानखेडे हे एनसीबीचे अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे माजी विभागीय संचालक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ड्रग्जशी संबंधित अनेक हाय प्रोफाइल प्रकरणं हाताळली आहेत. त्यामुळे ते कायमच प्रकाशझोतात असत. व्यक्तिगत आयुष्याबाबत सांगायचं झालं तर क्रांती रेडकर या अभिनेत्रीचे ते पती आहेत.
समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्यात शत्रुत्व असण्याचं कारण काय?
समीर वानखेडे यांनी २०२१ मध्ये हाय प्रोफाइल ड्रग्जचं प्रकरण हाताळलं होतं. या प्रकरणात ३ ऑक्टोबर २०२१ ला कॉर्डिलिया क्रूझवरुन समीर वानखेडे यांनी आर्यन खानसह एकूण सहा जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. समीर वानखेडे या प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. आर्यन खानला या प्रकरणी जवळपास २७ दिवस तुरुंगात काढावे लागले होते. त्यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला. ३० ऑक्टोबर २०२१ ला आर्यन खानला जामीन देण्यात आला. या प्रकरणी तेव्हाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही समीर वानखेडे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले होते.
समीर वानखेडेंनी कोर्टात धाव का घेतली आहे?
“बॅड्स ऑफ बॉलीवूड” सीरीजमधील चित्रण खोटे आणि बदनामीकारक असल्यामुळे त्याविरोधात मनाई आदेश देण्यात यावा, तसेच नुकसानभरपाईच्या स्वरुपात दिलासा मिळावा, अशी मागणी समीर वानखेडेंच्या वतीने करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या याचिकेत दोन कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी दिली जाईल, असा प्रस्ताव वानखेडे यांनी ठेवला आहे.
बॅड्स ऑफ बॉलिवूडलमधला तो प्रसंग काय?
बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये समीर वानखेडेंशी साधर्म्य साधणारं पात्र त्याचं नाव सांगत नाही. पण ते सत्यमेव जयते म्हणत असतं. समीर वानखेडे यांनी हा देखील आक्षेप घेतला आहे की राष्ट्रप्रेमाविषयीच्या कायद्यासंदर्भातलं हे उल्लंघन आहे. आपल्यासारख्या पात्राची या वाक्याने खिल्ली उडवण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
काय आहे बॅड्स ऑफ बॉलिवूड?
बॅड्स ऑफ बॉलिवूड ही वेब सीरिज आर्यन खानने दिग्दर्शित केली आहे. या वेबसीरिजमध्ये बॉबी देओल, लक्ष्य आणि राघव जुयाल प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय या वेब सीरिजमध्ये रणबीर कपूर, सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग यांच्यास अनेक तारे तारका पाहुण्या कलाकरांच्या भूमिकेत आहेत. या वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज मागच्या आठवड्यात प्रदर्शित झाली आहे.