Kajol on Saif Ali Khan: बॉलीवूडचे अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या मुलाखतींमुळेदेखील मोठ्या चर्चेत असतात. त्यांनी मुलाखतीत केलेली वक्तव्ये, सांगितलेल्या आठवणी, तसेच किस्से मोठ्या चर्चेत असतात.
बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार आणि अभिनेता सैफ अली खान यांनी नुकतीच टू मच विथ काजोल अँड ट्विंकल या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ट्विंकलने आज आपल्याबरोबर असे पाहुणे आहेत, ज्यांनी काजोलच्या बाथरूममध्ये अंघोळ केली आहे, असे म्हणत सैफ अली खानची ओळख करून दिली.
“तुझ्या घरी येऊन मी…”
त्यावर काजोल ती घटना स्पष्ट करीत म्हणाली, “सैफ जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आला होता, तेव्हा तो माझ्या घराजवळ राहत होता. मलबार हिलमध्ये अशी काही ठिकाणे आहेत, जिथे पाण्याचा पुरवठा होत नाही.”
त्यावर सैफ अली खान म्हणाला, “मी मुंबईत आलो तेव्हा मला भेटलेली फिल्म इंडस्ट्रीमधील तू पहिली व्यक्ती होतीस. मला हे आठवते की, आपली घरे जवळ होती. आपण एकमेकांच्या शेजारी राहत होतो. मला तुझा फ्लॅट आठवतो; पण तुझ्या घरी येऊन मी अंघोळ केल्याचे आठवत नाही.”
काजोल सैफ अली खानला आठवण करून देत आई तनुजाचे शब्द सांगितले, “माझी आई म्हणालेली की तुला अंघोळ करायची असेल, तर जाऊन आता अंघोळ कर.”
अक्षय कुमारनेदेखील सैफ अली खानच्या बाथरूम स्टोरी सांगितल्या. अक्षय कुमार, काजोल व सैफ अली खान यांनी १९९४ च्या ‘ये दिल्लगी’ चित्रपटात काम केले होते. दिवंगत अभिनेते सईद जाफरी यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सैफ अली खान आणि सईद जाफरी यांचा बाथटबचा किस्सा
अक्षय कुमारने सैफ अली खान आणि सईद जाफरी यांचा बाथटबचा एक किस्सा सांगितला. तू आणि जाफरीसाहेब बाथरूममध्ये नव्हता का? त्यावर सैफ अली खान म्हणाला, “आम्ही ‘ये दिल्लगी’ चित्रपटात एकत्र काम केले. जाफरीसाहेब खूप चांगले व्यक्ती होते. काही वेळा ते दारू प्यायचे आणि सार्वजनिक कार्यक्रमात माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपायचे. झोपेतून उठायचे आणि मला विचारायचे की, तो अजूनही बोलत आहे? ते खूप मजेशीर होते.”
पुढे गोंधळून सैफने विचारले की, मी त्यांचे बाथरूम वापरले होते का? त्यावर अक्षय म्हणाला, “नाही. तू बाथरूममध्ये होतास. त्यानंतर ते तुझ्या बाथरूममध्ये आले. त्यांची रूम तुझ्या रूमच्या बाजूलाच होती. तर, ते त्यांचे बाथरूम कुठे आहे, हे विसरले आणि ते तुझ्या बाथरूममध्ये आले.”
अक्षय पुढे हसत म्हणाला, “बाथरूममध्ये आल्यानंतर त्यांना अंघोळ करायची होती. त्यांनी अगोदरच त्यांचे कपडे काढले होते. त्यांनी बाथरूमचा पडदा ढकलला आणि त्यांना सैफ तिथे दिसला. ते विचार करीत होते की, सैफ माझ्या बाथरूममध्ये का आला आहे? ते काहीच बोलले नाहीत आणि आत गेले. सैफ आणि जाफरीसाहेब एकाच टबमध्ये होते.”
त्यावर सैफ म्हणाला, “नाही. हे कधी घडलं?”, अक्षय कुमार त्यावर म्हणाला की, हे कोणाबरोबरही घडू शकते. त्यावर ट्विंकल म्हणाली की, हे कोणाबरोबरही घडू शकत नाही.
दरम्यान, अक्षय कुमार, काजोल व सैफ अली खान यांच्या ये दिल्लगी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.