युवराज सिंगचे वडील माजी क्रिकेटपटू आणि अभिनेते योगराज सिंग यांनी मुलाचं क्रिकेटमधील करिअर, लोकांची टीका, मुलाचं लग्न अशाच बऱ्याच गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. युवराजला लग्न करताना ‘ब्रीड’ (बिरादरी) बदलायला सांगितलं होतं, असं योगराज म्हणाले.

कृष्णांक अत्रे यांना दिलेल्या मुलाखतीत, योगराज यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुनावलं. टीका करणाऱ्यांनीच नंतर युवराजच्या कामगिरीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असं वक्तव्य त्यांनी केलं. “जेव्हा मी युवराजला प्रशिक्षण द्यायचो, तेव्हा लोक पोलिसांकडे तक्रार करायचे. ते म्हणायचे की युवराजने वडील वेडे झाले आहेत आणि परिसरात इतरांना त्रास देत आहेत. काही म्हणायचे की मी माझ्या स्वतःच्या मुलाला मारून टाकेन. युवराजच्या आईलाही असंच वाटायचं. ती म्हणायची, ‘हा मुलाला मारून टाकेल,'” असं योगराज म्हणाले.

“आता युवराज लोकप्रिय झाला आहे, त्यामुळेच तेच लोक त्याचं श्रेय घेऊ इच्छितात. त्याची आई म्हणते, ‘मी त्याला कढी भात खाऊ घातलं.’ तर काही जण म्हणतात, ‘आम्ही त्याच्यासासाठी गोलंदाजी केली.’ हे तेच लोक आहेत ज्यांनी एकेकाळी माझी तक्रार केली होती. आता सर्वांना श्रेय हवं आहे,” असं योगराज म्हणाले.

अजूनही जपून ठेवलाय युवराजचा टी-शर्ट

एकेकाळी युवराज देखील त्यांच्या प्रशिक्षणाबद्दल नाराज होता, असं योगराज यांनी सांगितलं. “जेव्हा मी त्याला कठोर प्रशिक्षण देत होतो, तेव्हा लोक मला टोमणे मारायचे. माझ्या मुलानेही मला हिटलर आणि ड्रॅगन म्हटलं होतं. पण देवाच्या कृपेने आणि देशावासियांच्या प्रेमामुळे तो चांगलं खेळला. तो कर्करोगाशी झुंजत असतानाही मी त्याला विश्वचषक खेळायला लावला. ‘या प्रक्रियेत मी तुला गमावलं तरी, मी एक अभिमानी पिता असेन ज्याने आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन त्याच्या चितेला अग्नी दिला,’ असं मी त्याला म्हणालो होतो. मी दिलेल्या प्रत्येक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. माझ्या मुलाने देशासाठी रक्त वाहिलं, याची आठवण म्हणून मी अजूनही त्याचा रक्ताने माखलेला टी-शर्ट जपून ठेवला आहे,” असं योगराज म्हणाले.

युवराजच्या लग्नासाठी दबाव

युवराजच्या लग्नाबद्दल योगराज यांनी भाष्य केलं. युवराजचं लग्न लवकर करण्यासाठी समाजाने कसा दबाव आणला होता, त्याबद्दल योगराज यांनी सांगितलं. “मी युवराजचे २० व्या वर्षी लग्न लावून द्यावे, असं लोकांना वाटत होतं. मी म्हणायचो, ‘त्याचं वय झालंय का?’ जेव्हा तो ३८ वर्षांचा झाला तेव्हा मी त्याला म्हणालो, ‘आता तू लग्नाचा विचार करू शकतोस. मी तुझ्यासाठी जोडीदार निवडू शकत नाही. तुझं आयुष्य आहे, त्यामुळे जोडीदार तूच शोध.’ पण मी त्याला ब्रीड बदलण्याची विनंती केली. हे ऐकल्यावर लोक कदाचित विरोध करतील, पण आम्हाला कुटुंबात आयरीश किंवा इंग्रजी मुलगी हवी होती. आणि मग हेझल आमच्या आयुष्यात आली. त्यांना खूप सुंदर मुलं आहेत आणि ते मला त्यांच्या मित्रासारखे वागवतात. मी हेझलला कधीच सून म्हणत नाही, ती माझी मुलगी आहे,” असं योगराज म्हणाले.

अभिनेत्री हेझल किच आणि युवराजचे लग्न २०१६ मध्ये झाले. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. युवराज सिंग हा योगराज सिंग व त्यांची पहिली पत्नी शबनम कौर यांचा मुलगा आहे. नंतर योगराज यांनी सतबीर कौरशी लग्न केलं. दुसऱ्या लग्नापासून त्यांना दोन अपत्ये आहेत. योगराज सिंग यांनी भारतासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले होते, परंतु दुखापतीमुळे त्यांचं करिअर संपलं. नंतर ते अभिनयाकडे वळले. त्यांनी ‘सिंग इज ब्लिंग’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.