बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षित ‘शेरशाह’ हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धा शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, सगळ्यांचे लक्ष वेधल ते म्हणजे विक्रम बत्रा आणि डिंपल चीमा यांच्या लव्ह स्टोरीने.
कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल यांची लव्ह स्टोरी ही भावूक करणारी आहे. विक्रम बत्रा यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण डिंपल यांच्याविषयी फार कोणाला माहिती नव्हतं. या चित्रपटानं डिंपल यांच्या त्यागाची, प्रेमाची माहिती जगासमोर आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून डिंपल यांच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रेक्षकांना लागली आहे.
View this post on Instagram
‘क्विंट’ने साधारण दोन वर्षांपूर्वी बत्रा यांच्या प्रेयसीची मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांनी विक्रम बत्रा आणि त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे. डिंपल छीमा असं विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीचं नाव. १९९५ मध्ये पंजाब विद्यापीठात त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. एमए इंग्रजीच्या अभ्यासक्रमासाठी दोघांनीही प्रवेश घेतला होता. अर्थात या दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं नाही. ‘आमची भेट घडवून आणण्यासाठीचा तो सर्व नियतीचाच खेळ होता’, असं डिंपल म्हणाल्या होत्या.
विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर काही काळातच बत्रा यांना देहरादून येथे असणाऱ्या सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला होता. तेव्हापर्यंत डिंपल आणि त्यांच्यात प्रेमाचा बहर आलाच होता. हे दोघं एकमेकांपासून दूर असूनही त्यांच्या मनात मात्र तेच होते. जसे दिवस जात होते तशी दोघांच्याही कुटुंबियांकडून लग्नाची विचारणा होऊ लागली होती. मुळात आपण एकमेकांसाठीच या जगात आलो आहोत, हे विक्रम आणि डिंपल जाणून होते. एके दिवशी मनसा देवी आणि श्री नाडा साहेब गुरुद्वारा येथे भेट दिली असता परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर विक्रम बत्रा हे अचानक डिंपल यांना म्हणाले, ‘अभिनंदन मिसेस बत्रा, आपण दोघांनी सोबतीने चार फेरे घेतले, तुमच्या लक्षात आलं नाही’, त्याचवेळी डिंपल यांच्या लक्षात आलं की पूर्णवेळ विक्रम त्यांच्या ओढणीचं टोक पकडून होते.
आणखी वाचा : मुलगा शहीद होतानाचा सीन पाहताना कॅप्टन विक्रम बत्रा यांचे आई-वडील झाले भावूक
कुटुंबियांकडून वारंवार होणाऱ्या लग्नाच्या विचारणेमुळे एक दिवस डिंपल यांनी विक्रम बत्रांना लग्नाबद्दल विचारलं होतं. विक्रम बत्रा यांनी आपल्या पाकिटातून ब्लेड काढलं आणि अंगठा कापला. यानंतर आपल्या अंगठ्याने त्यांनी डिंपल यांची भांग रक्ताने भरली. हा जीवनातील सर्वात अनमोल क्षण होता, असं डिंपल यांनी सांगितलं. कुंकवाच्या जागी, रक्ताने डिंपल यांच्या कपाळावर विक्रम यांनी त्यांच आयुष्य एकमेकांशी जोडून घेतलं होतं.
आणखी वाचा : आगळा वेगळा विवाहसोहळा! असे झाले अनिल कपूर यांच्या मुलीचे लग्न
या साऱ्यामध्येच कारगिल युद्धाची घोषणा झाली आणि बत्रा यांना बोलवण्यात आलं. डिंपल विक्रम बत्रा यांची वाट पाहत राहिल्या. ते शहीद झाल्यानंतरही त्यांच्या प्रतीक्षेत त्या आहेत. एका सैनिकाच्या प्रेमकहाणीचा हा अंत असला तरीही डिंपल यांनी आपल्या प्रेमाचा कायम अभिमान बाळगला. ‘न्युजरूम पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार डिंपल या शाळेत शिक्षिका आहेत आणि त्यांनी विक्रम बत्रा यांची विधवा बनून जगण्याचा निर्णय घेतला.
‘शेरशाह’ चित्रपटातील डिंपल यांच्या भूमिकेच्या तयारीसाठी कियारा अडवाणीने डिंपल यांची भेट घेतली होती. त्यांची कहाणी ऐकून कियारा देखील भारावून गेली होती. ‘डिंपल या एक अनसंग हिरो आहेत. ज्यांनी आपल्या प्रेमासाठी आपले आयुष्य अर्पण केले. प्रत्येक आव्हानाचा सामना केला. डिंपल या आजच्या भारतीय महिला आहेत, ज्या स्वतःचा निर्णय स्वतः घेतात आणि त्याचा अभिमान बाळगतात. प्रत्यक्षात चार चौघांच्या साक्षीनं लग्न झालेलं नसताना देखील आपल्या शहीद प्रियकराच्या आठवणीत कायम अविवाहित राहण्याचा त्यांचा निर्णय आणि तिचा प्रेमावरील विश्वास मला नेहमीच प्रेरणा देईल,’ अशी भावना तिनं व्यक्त केली आहे.