‘तुज विन सख्या रे’ या मालिकेमुळे गौरव घाटणेकर हा चेहरा घराघरांत पोहचला. मास मीडिया केलेल्या गौरवचं आयुष्य नसिरुद्दीन शहा यांच्यामुळे बदलले. व्हिसलिंग वूडमध्ये नसिरुद्दीन शहा हे त्याचे शिक्षक होते. त्यांच्याकडे शिकत असतानाच अभिनय क्षेत्रामध्ये करियर करण्याचा त्याचा निर्णय पक्का झाला. ‘महाभारत’, ‘धर्मक्षेत्र’ सारख्या हिंदी मालिकांमध्ये झळकलेला गौरव लवकरच प्रियांका चोप्राच्या निर्मिती अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या ‘काय रे रास्कला’ चित्रपटात दिसणार आहे. अगदी लहान मुलांप्रमाणे खोडकर वाटणाऱ्या गौरवचं पहिलं क्रशही अल्लड वयातच झालं. शाळेत असताना त्याच्या सायन्स टिचरवरच या पठ्ठ्याला क्रश झालं होतं.
वाचा : ‘बाहुबली २’ मधील या चुका तुमच्या लक्षात आल्या का?
माझी सायन्स टिचर माझं क्रश होती. शाळेत असताना मला तिच्याच विषयात सर्वात जास्त गुण मिळायचे. त्या वर्गात ज्या काही बोलायच्या ते माझ्या काळजाला जाऊन भिडायचं. त्यामुळेच कदाचित मला सायन्समध्ये चांगले गुण मिळायचे. प्रेम किंवा क्रश आयुष्याचा एक चांगला भाग असतो, असं म्हणतात. तर माझं हे क्रश मला अशाप्रकारे उपयोगी पडलं. शाळेत असताना मी रिक्षाने घरी जायचो. एकदा त्या टिचर बससाठी थांबल्या होत्या आणि मी रिक्षाने घरी निघालो होतो. तर मी त्यांच्यासाठी रिक्षा थांबवली. माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. त्यामुळे मी अडखळतच मॅम…. कॅन आय…. असं म्हणालो. तर त्या म्हणाल्या ‘नो, बेटा….’ त्यावेळी माझं ‘हार्टब्रेक’ झालं. खरंतर त्या बेटा म्हणाल्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं.
वाचा : बॉलिवूड पदार्पणापूर्वीच अंकिताच्या वाट्याला आणखी एक चित्रपट
दरम्यान, गौरवने त्याच्या आगामी ‘काय रे रास्कला’ चित्रपटाबद्दलही सांगितलं. हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे. यात कंबरेखालचे विनोद अजिबात नाहीत. लहान मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चित्रपट पाहताना खूप मजा येईल. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत आपण ‘रिंगण’, ‘सैराट’ यांसारखे विचार करायला लावणारे चित्रपट पाहिले. पण ‘काय रे रास्कला’ निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे. आजच्या घडीला आपल्याला आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे तणावाच वातावरण पाहायला मिळतंय. त्यात हा चित्रपट तुम्हाला दोन तासासाठी पोट धरुन हसायला भाग पाडेल, असे गौरव म्हणाला.
चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com