राजकीय व्यक्तिमत्वांवर आधारित अनेक चित्रपट आजवर आले आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या एका दूरदर्शी आणि खंबीर नेतृत्वाचा प्रवास मोठया पडद्यावर येऊ घातला आहे. ‘महानायक वसंत तू’ या आगामी मराठी चित्रपटातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाची ‘पहिली झलक‘  नुकतीच प्रदर्शित करण्यात आली .
आदिती फिल्म प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि बळीराम राठोड निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांनी केले आहे. बंजारा समाजातील एक मुलगा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपलं जीवन घडवत राजकारणात येतो आणि आपल्या आत्मविश्वास व प्रयत्नांच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचतो, याचा अचंबित करणारा प्रेरणादायी प्रवास ‘महानायक वसंत तू’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. येत्या २७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
chinmay-udgirkar-1
एका तांडयाचा नायक ते महाराष्ट्राचा महानायक असा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या सिनेमात वसंतराव नाईक यांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाचा प्रवास साकारायला मिळणं हे भाग्याचं असल्याचं अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी यावेळी सांगितलं.प्रसन्नजीत कोसंबी ,किर्ती किल्लेदार, आदर्श शिंदे, स्वप्नजा लेले यांनी गायलेल्या गीतांना मंदार खरे यांचं सुमधूर संगीत लाभलं आहे.
चिन्मय सोबत निशा परुळेकर, रवी पटवर्धन, भारत गणेशपुरे, प्रकाश धोत्रे, जयराज नायर, आशिष कुलकर्णी, जयंत पत्रीकर. सतीश फडके, ययाती राजवाडे, पराग बोहोडकर, कल्याणी भागवत, योगेश भालेकर आदि कलाकार सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.  पाहुण्या कलाकाराच्या विशेष भूमिकेत प्राजक्ता माळी दिसणार आहे. २७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.