नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं. तसेच त्यांच्या कृतीवर आवाज उठवल्यानंतर त्यांनी मनसेकडून मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती असा गंभीर आरोप अभिनेत्री तनुश्री दत्तानं केला. या आरोपानंतर बॉलिवूडचा कोरिओग्राफर गणेश आचार्यानं तनुश्रीचे सर्व आरोप खोडून काढले. मात्र तनुश्रीनं गणेश आर्चायला खोटं ठरवलं आहे. गणेश आचार्य हा एक नंबरचा खोटारडा माणूस असून तो गैरवर्तनात नानांसोबत सहभागी होता म्हणूनच तो त्यांची बाजू घेत आहे असा पलटवार तनुश्रीनं केला आहे.

‘गणेश आचार्य हा खोटारडा असून तो दुतोंडीदेखील आहे. त्याला माझ्यामुळे काम मिळलं पण तो हे सोयीस्कररित्या विसरला आहे , त्यानं माझा विश्वासघात केला आहे. नाना पाटेकर यांना गणेश आचार्य पाठिंबा देत आहे याचं मला काहीच आश्चर्य वाटणार नाही कारण नानाच्या कृतीत गणेश आचार्यही सहभागी होता’ अशी प्रतिक्रिया तनुश्रीनं एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

२००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तिनं ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. #metoo मोहीमेबद्दल बोलताना तिनं नानांनी केलेल्या असभ्य वर्तनावर भाष्य केलं होतं.
‘या खूप जून्या गोष्टी आहेत. मला यातलं नेमकं काही आठवत नाही . मात्र नानांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकांना सेटवर बोलावलं नव्हतं. काही गैरसमजातून गाण्याचं चित्रिकरण काही तास थांबवण्यात आलं होतं. मात्र नानानं तिच्यासोबत कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन केलं नाही’ असं म्हणत गणेश आचर्यनं नानांची पाठराखण केली होती.