चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी मंडळींच्या लग्नाची जितकी चर्चा होते तितकीच त्यांच्या घटस्फोटाचीही होते. बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड सगळीकडे ही गोष्ट लागू होते. नुकतीच हॉलिवूडच्या सुप्रसिद्ध सुपरस्टार जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्या घटस्फोटाची केस चांगलीच चर्चेत होती. त्यांच्या या केसची सुनावणी जगभरात लाईव्ह दाखवली जात होती. तसंच भारतीय चित्रपटसृष्टीतही कलाकारांच्या घटस्फोटाच्या चर्चा खूप होतात.
दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि त्याची बायको म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या यांनी मध्यंतरी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. २००४ मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले आणि तब्बल १८ वर्षांनी यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. याच वर्षी जानेवारी महिन्यात ऐश्वर्याने सोशल मीडिया अकाऊंटवर ही माहिती शेअर करत लिहिलं होतं की, “१८ वर्षे आपण एक मित्र, जोडपं, पालक, हितचिंतक म्हणून एकमेकांबरोबर होतो. पण आज आपले मार्ग वेगळे झालेले दिसत आहेत. धनुष आणि मी आम्ही दोघांनी मिळून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून आम्हाला स्वतःला आणखीन उत्तमरित्या समजून घ्यायला मदत होईल.”
धनुषनेही अशीच पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली होती. त्यांच्या या वेगळं होण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांनाही धक्काच बसला होता. पण आता मात्र त्यांनी पुन्हा एकत्र येऊन गैरसमज दूर करायचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐश्वर्याचे वडील रजनीकांतसुद्धा यामध्ये पडले असून तेच या दोघांना पुन्हा एकत्र आणायची खटपट करत असल्याचं म्हंटलं जात आहे.
आणखी वाचा : “तरीही ब्रह्मास्त्र सुपरहीट..” बॉयकॉट ट्रेंड आणि चित्रपटांच्या यशाबद्दल अभिनेता रितेश देशमुखने मांडलं मत
सध्याच्या काही मीडिया रीपोर्टनुसार ऐश्वर्या आणि धनुष यांनी त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया काही काळ स्थगित केली असून ते दोघे त्यांच्यातले गैरसमज मिटवण्याचे प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अजूनतरी या दोघांकडून अधिकृत माहिती मिळाली नाही, तरी सोशल मीडियावर ते दोघे घटस्फोट घेण्यार नसल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. यामुळे धनुषचे चाहतेही चांगलेच खुश झाले आहेत. धनुष नुकताच ‘नानू वारुवेन’ या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याने दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६५ कोटी इतकी कमाई केली.