बॉलिवूडचे चित्रपट सातत्याने फ्लॉप होत आहेत. प्रेक्षक चित्रपटांकडे पाठ फिरवत असून अनेक चित्रपटांचे शो रद्द केले जात आहेत. या वर्षी बॉलिवूडने ब्लॉकबस्टर म्हणावा असा एकही चित्रपट दिलेला नाही. अशातच बॉलिवूडला बॉयकॉट ट्रेंड्स, घराणेशाहीवरून होणाऱ्या टीकेला सामोरं जावं लागतंय. त्यातच आता प्रादेशिक चित्रपटांचा दबदबा वाढतोय. त्यामुळे बॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमांची तुलना होऊ लागली आहे. येत्या काळात प्रादेशिक सिनेमांशी स्पर्धा करण्याची वेळ बॉलिवूडवर येऊ शकते. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमिवर एका दिग्दर्शकाने बॉलिवूडला महत्वाचा सल्ला दिला आहे.
‘रईस’ आणि ‘परजानिया’ सारख्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी बॉलिवूडने काय करायला हवं, याबद्दल सल्ला दिला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, “बॉलिवूडमधील आमच्या बंधुनी काय केले पाहिजे यावर माझे २ सेंट: १. चांगले चित्रपट बनवा. २. COP कमी करा ३. तिकिटांच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करा ४. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तीन महिने तो OTT वर प्रदर्शित करू नका आणि ५. उद्धटपणा सोडा आणि सर्वांना सोबत घेऊन चला, कदाचित या सर्व गोष्टी मदत करतील?”
दरम्यान, अनेक ट्वीटर युजर्सनी राहुल ढोलकिया यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे. तसेच बॉयकॉट गँगला दोष देण्याऐवजी कोणी तरी खरं बोलण्याची वेळ आली आहे, असंही म्हटलंय. एका युजरने राहुल यांना रिप्लाय देताना लिहिलं की, “तुम्हाला थोडंफार कळलं याचा आनंद झाला पण तरीही ते काम करणार नाही. भारताचे, संस्कृतीचे, सनातन धर्माचे, समाजाचे चांगल्या प्रकारे चित्रण करणारे चित्रपट बनवा. नेपोटिझमपासून मुक्त व्हा. चांगले संशोधन, चांगली सिनेमॅटोग्राफी, भाषा आणि चांगल्या कंटेंटचे चित्रपट बनवणं, यांस प्राधान्य द्या. OTT आणि किमतीला दुय्यम स्थान द्या,” असा सल्ला या युजरने दिला आहे.