मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सापडली आहे. नवी दिल्ली इथे गेल्या पाच तासांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिस ईडीच्या प्रश्नांचा सामना करतेय. ‘भूत पुलिस’ फेम अभिनेत्री जॅकलीनची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरूय. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत येत असते.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरू केली आहे. राजकीय वर्तुळासोबत आता बॉलिवूडमध्ये सुद्धा मनी लाँड्रिंग प्रकरणाचे धागे दोरे मिळण्यास सुरूवात झालेली आहे. जॅकलीनची ‘भूत पोलीस’मधील सह-कलाकार यामी गौतमला ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा अंतर्गत कथित अनियमिततांबाबत तिचं जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. आता यानंतर जॅकलीनला देखील ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी बोलावलं होतं. गेल्या पाच तासांपासून ईडीकडून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या बँक खात्यात एका परदेशी संस्थेकडून तब्बल १ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम आली होती. यात फेमा मार्गदर्शक तत्वांचं कोणतंही पालन करण्यात आलेलं नाही. यामी गौतमची चौकशी केल्यानंतर तिचीच सहकलाकार जॅकलीन फर्नांडिसला ईडीने चौकशीसाठी बोलावून घेतलं. मात्र, जॅकलीनच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एका परदेशी संस्थेतून तिच्या खात्यात व्यवहार कशासाठी आणि कसा झाला, याबाबत ईडी चौकशी करत आहे.

सलमान खानची जवळची मैत्रीण आहे जॅकलीन

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची अतिशय जवळची मैत्रीण आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांत सलमान खानसोबत एकत्र काम केलंय. या दोघांची जवळीक पाहून मध्यंतरी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.

जॅकलीन भूत पोलिसांबद्दल चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या आगामी ‘भूत पोलीस’ चित्रपटामुळे बराच काळ चर्चेत आली होती. सैफ अली खान आणि अर्जुन कपूर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत आणि यामी गौतमी आणि जॅकलीन फर्नांडिस या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाचा ट्रेलर यापूर्वी प्रदर्शित झाला आहे. जॅकलीनचा’भूत पोलिस’ हा आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट 17 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.