Gauri Ingawale Talks About Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते आहेत. नुकताच त्यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट प्रदर्शित झाला. तर, सध्या त्यांच्या नवीन नाटकाची चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये त्यांची लेक गौरी इंगवलेदेखील झळकत आहे. अशातच आता तिने महेश मांजरेकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली असून, त्यांचे आभार मानले आहेत.

महेश मांजरेकर यांचं ‘कुणीतरी आहे तिथं’ हे नाटक नुकतच रंगभूमीवर सुरू झालं आहे. सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला. या नाटकात मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळतात; तर महेश मांजरेकर यांची लेक गौरी इंगवले यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. गौरीने यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत नाटक आणि महेश मांजरेकर यांच्याबद्दल सांगितलं आहे.

‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिला या नाटकाबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी खूप उत्सुक आहे. कारण- खूप वर्षांनी मी नाटक करीत आहे. कुमार सोहोनीसर दिग्दर्शन करीत आहेत आणि सगळीच टीम नवीन आहे. त्यामुळे छान वाटतंय.” पुढे ती नाटकातील भूमिकेबद्दल म्हणाली, “आव्हानं तर खूप आहेत या भूमिकेत; पण मला आता त्याबद्दल काही सांगायचं नाहीये. कारण- ते प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहे. हे खूप रहस्यमय आणि थ्रिलर जॉनर असलेलं नाटक आहे. हे नाटक खूप वर्षांपूर्वी आधी झालेलं आहे. त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न करीत आहे.”

गौरी इंगवलेने मानले महेश मांजरेकर यांचे आभार

महेश मांजरेकर यांच्याबद्दल गौरी म्हणाली, “आमचं बऱ्याच वेळा बोलणं होतं की, मला असं करायचं आहे वगैरे. पप्पांनी मला सांगितलं की, तुला हे नाटक करायला आवडेल का? तेव्हा मी म्हटलं की, हो मला मजा येईल करायला. त्यांनी माझ्यासाठी जे केलंय, त्यासाठी मी त्यांची खूप ऋणी आहे. त्यांनी मला साताऱ्यावरून इथे माझ्या करिअरसाठीच आणलं आणि मला मुलगी मानलं. आता १३ वर्षं झाली मी त्यांच्याबरोबर आहे; पण मी आयुष्यभर त्यांच्यासाठी, कुटुंबीयांसाठी ऋणी आहे.”

‘कुणीतरी आहे तिथं’ या नाटकातील सहकलाकारांबद्दल गौरी म्हणाली, “धमाल येते या सगळ्यांबरोबर काम करायला आणि खूप शिकायला मिळतं. आम्ही थोडे दिवसच झालेत तालीम करतोय; पण पहिल्या दिवशीच आमची चांगली ओळख झाली.”

मांजरेकर कुटुंबीयांबद्दल गौरी म्हणाली, “सगळेच खूप उत्सुक असतात. मी काही नवीन करीत असते तेव्हा आणि मला जर काही शंका असेल, तर मी घरी जाऊन आई-पप्पांशी बोलते की, मी हे कसं करू शकते वगैरे आणि मला ते मदत करतात.”