बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून गुटरगू सुरू असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय. नुकताच या दोघांचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात विकी कौशल हा कतरिनाच्या घरातून बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यानंतर या दोघांच्या रिलेशनशीपवर अभिनेता हर्षवर्धन कपूरने शिक्कामोर्तब केलंय.
एका माध्यमासोबत झूम चॅटवर बोलताना अभिनेता हर्षवर्धन कपूरने हा शिक्कामोर्तब केलंय. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत, असं देखील तो यावेळी म्हणाला. सध्या बॉलिवूडमध्ये कोणाच्या रिलेशनशीपच्या बातम्या खऱ्या किंवा प्रसिद्धीसाठीच्या वाटतात, असा प्रश्न यावेळी हर्षवर्धन कपूरला केला. त्यावर उत्तर देताना हर्षवर्धन कपूर म्हणाला, “विकी आणि कतरिना हे एकत्र आहेत आणि हे खरं आहे.” हे बोलताना आपल्याकडून थोडी गडबड झाली हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर थोडा ब्रेक घेऊन पुढे आणखी म्हणाला, “असं बोलून मी कशाला अडचणीत येऊ ?” तो अडचणीत येईल की नाही, हा पुढचा विषय झाला. पण या बातमीने विकी आणि कतरिना दोघांचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत.
‘कॉफी विथ करण’मधून झाली सुरवात
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या अफेअरची चर्चा २०१८ पासून सुरू झाली. करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये कतरिनाला विचारलं होतं की, तिच्याबाजुला कोणता अभिनेता शोभेल ? यावर उत्तर देसाना कतरिनाने विकी कौशलचं नाव सांगितलं होतं. त्यानंतर याच चॅट शोमध्ये जेव्हा विकी कौशल आला होता, त्यावेळी कतरिनाने दिलेल्या उत्तराबाबत त्याला सांगितलं. कतरिनाने दिलेलं उत्तर ऐकून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
सलमान खानसमोर कतरिनाला केलं होतं प्रपोज
२०१९ मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलने कतरिनाला प्रपोज केलं होतं. यावेळी सलमान खान हा प्रेक्षकांच्या खुर्चीत बसलेला होता. विकी कौशल या पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन करत होता.
विकी कौशलने कतरिनाला विचारलं, “सध्या लग्नसराईचं वातावरण सुरूये…त्यामुळे मला असं वाटलं एकदा तुला विचारून घेऊ ?” यावर कतरिना म्हणते, काय?, यावर हसत उत्तर देताना विक्की म्हणला, “माझ्याशी लग्न करशील ?” त्यानंतर कतरिना म्हणाली, ‘माझ्यात इतकी हिंमत नाही’.