मध्यंतरी हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप आणि अभिनेत्री अंबर हर्ड हे दोघेही चांगलेच चर्चेत होते. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा खरंतर बरीच वर्षं रंगत होत्या. त्यांच्या घटस्फोटाच्या लाईव्ह खटल्याने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आता हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा चर्चेत आहे, पण एका वेगळ्या कारणासाठी. तब्बल २५ वर्षांनंतर जॉनी इटालियन चित्रकार आणि मूर्तिकार अमेडेव मोडीलियानी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
इटालियन चित्रकार आणि मूर्तीकार मोडीलियानी यांच्याबेतलेल्या या चित्रपटाचं नाव ‘मोदी’ हे ठेवण्यात आलं आहे. अर्थात या नावावरून बऱ्याच लोकांचा गैरसमज होत आहेत. या बायोपिकचा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. एका अमेरिकन नाटकावर हा चित्रपट बेतलेला आहे.
आणखी वाचा : ८१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी उर्फी जावेदने उडवली अशनीर ग्रोव्हरची खिल्ली; निमित्त ठरला ‘हा’ व्हिडीओ
लवकरच युरोपमध्ये जॉनी डेपच्या या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटात अभिनेता रिकार्डो स्कामार्सिओ याला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. जॉनी डेपसाठी हा त्याच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे. सुप्रसिद्ध अभिनेता अल पचीनो यांच्याबरोबर जॉनी डेप या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
इटलीमध्ये जन्म घेतलेल्या मोडीलियानी यांनी बहुतांशकरून पॅरिसमध्येच काम केलं आहे. २० व्या शतकातील एक अद्वितीय चित्रकार आणि मूर्तिकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांची काही विशिष्ट शैलीतली पोर्ट्रेट्स आणि काही नग्न चित्रं यासाठी ते प्रसिद्ध आहेत. १९०४ ते १९१४ या काळात त्यांनी त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती घडवण्यात झोकून दिलं.