बॉलिवूडमधील एक सर्वोत्कृष्ट अभिनेता अशी ओळख असलेल्या इरफान खान यांचे २९ एप्रिल २०२० निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. इरफान खान हे अनेक वर्षांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त होते. नुकतंच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या आठवणी ताज्या केल्या आहे. इरफान खान यांच्या मरणाच्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात झालेले संभाषण नसीरुद्दीन यांनी शेअर केले आहे.

नुकतंच नसीरुद्दीन शाह यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “इरफान खान यांना त्यांच्या मृत्यूची माहिती काही वर्षांपूर्वीच मिळाली होती. हे फार विचित्र होते. इरफान खान यांना दोन वर्षांपूर्वीपासूनच माहिती होते की त्यांचे निधन होणार आहे. मी अनेकदा ते लंडनच्या हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या फोनवर बोलायचो.”

“इरफान खानला त्याचा मृत्यू जवळ येत असल्याचा अनुभव येत होता. माझे मरण येत असल्याचे मला दिसत आहे. ही अशी संधी किती जणांना मिळते. मृत्यू तुमच्या समोर येऊन उभा असतो आणि तुम्ही त्याचे जवळजवळ स्वागतच करत असता. अर्थात हे मोठे नुकसान होते. पण ते आपल्या हातात नव्हते. यात फक्त तुमची शारिरिक यंत्रणा बंद पडली होती. ज्यावर तुम्ही नियंत्रण करु शकत नाही,” असे नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले.

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी २९ एप्रिल २०२० रोजी निधन झाले. colon infection मुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र २९ एप्रिलला सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता.

हेही वाचा : Video : “आता म्हातारी झाल्यावर हौस पूर्ण करतेय”, कपड्यांवरुन संगीता बिजलानी ट्रोल

इरफान खानने ‘तलवार’, ‘पानसिंग तोमर’, ‘पिकू’, ‘लाइफ ऑफ पाई’, ‘हिंदी मीडियम’ इत्यादी सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. इरफान खान एक उत्कृष्ट अभिनेता होता, ज्याच्या अभिनयाला आणि त्याच्यासारख्या व्यक्तीला कोणी विसरणार नाही.