Jatadhara Box Office Collection Day 1: सोनाक्षी सिन्हासाठी मागील काही वर्षे चांगली राहिली नाही. तिचा ‘निकिता रॉय’, ‘डबल एक्सएल’, ‘कलंक’ असे तिचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळले. आता तिचा ‘जटाधारा’ सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे. ‘जटाधारा’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केले, याची आकडेवारी समोर आली आहे.

सोनाक्षी सिन्हा व सुधीर बाबू यांच्या मुख्य भूमिका असलेला थ्रिलर ‘जटाधारा’ शुक्रवारी, ७ नोव्हेंबरला रिलीज झाला. हा चित्रपट भारतीय पौराणिक कथा आणि आधुनिक भयपटाचे मिश्रण आहे. बॉक्स ऑफिसवर ‘जटाधारा’ची सुरुवात संथ झाली आहे. अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराच्या दैवी पार्श्वभूमीवर आधारित, हा चित्रपट विज्ञान, श्रद्धा आणि गूढ याचा मिलाफ आहे. मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने २५ वर्षांनी जटाधारामधून अभिनयात पुन्हा पदार्पण केलं आहे.

‘जटाधारा’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

सोनाक्षी सिन्हाच्या ‘जटाधारा’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केलेली नाही. या चित्रपटाचे कलेक्शन लाखांमध्ये आहे. ‘हक’ व ‘द गर्लफ्रेंड’बरोबर रिलीज झालेल्या जटाधाराने दोन्ही सिनेमांपेक्षा कमी कलेक्शन केलंय. जटाधाराने पहिल्या दिवशी देशभरात ९५ लाख रुपये कमावले. हक सिनेमाने १.६५ कोटी, तर द गर्लफ्रेंडने १.३० कोटींचे कलेक्शन केले.

‘जटाधारा’ चित्रपटाची कथा

‘जटाधारा’ हा चित्रपट शिव नावाच्या सुधीर बाबूने साकारलेल्या पात्रावर आधारित आहे. तो भूत-प्रेतांबद्दल जाणतो. त्याला एका महिलेने एका मुलाची हत्या केली, असं स्वप्न पडत असतं. नंतर त्याच्या स्वतःच्या घरात एक गूढ फोटो सापडल्याने तो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात तो धन पिशाचिनीपर्यंत (सोनाक्षी सिन्हा) पोहोचतो. धन पिशाचिनी ही संपत्तीचे रक्षण करणारी एक पौराणिक राक्षस असते. शिव त्याच्या भूतकाळातील धक्कादायक सत्ये उलगडतो ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलते. यानंतर नशीब, श्रद्धा आणि विश्वास यांच्यात एक नाट्यमय संघर्ष सुरू होतो.

‘जटाधारा’मधील कलाकार

‘जटाधारा’मध्ये सुधीर बाबू, सोनाक्षी सिन्हा, शिल्पा शिरोडकर आणि दिव्या खोसला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘जटाधारा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जयस्वाल आणि वेंकट कल्याण यांनी केले आहे. झी स्टुडिओजसह एस के जी एंटरटेनमेंटने निर्मिती केली आहे.