Jolly Llb 3 Box Office Collection Day 1 : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा बहुप्रतिक्षित ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट शुक्रवारी (१९ सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, प्रत्येक पात्राचे कौतुक झाले. चित्रपटात हुमा कुरेशी आणि अमृता राव यांच्याही भूमिका आहेत.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘जॉली एलएलबी ३’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले ते जाणून घेऊयात.
कोर्ट ड्रामा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक दिवस उलटला आहे. आता चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १२.५० कोटी रुपये कमावले आहेत.
‘जॉली एलएलबी ३’ च्या कमाईत आठवड्याच्या शेवटी, म्हणजे शनिवार आणि रविवारी आणखी मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी २’ ने पहिल्या दिवशी १३ कोटी रुपये कमावले होते.
‘जॉली एलएलबी ३’ ने पहिल्या दिवसाच्या कमाईसह ‘तन्वी द ग्रेट’, ‘आँखों की गुस्ताखियां’, ‘केसरी वीर’, ‘ग्राउंड झिरो’, ‘लव्हयापा’ आणि ‘वनवास’ यांसह अनेक चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडला आहे.
‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट सुभाष कपूर यांनी दिग्दर्शित केला आहे. पहिल्या फ्रँचायझीमध्ये अर्शद वारसी मुख्य भूमिकेत होता, तर दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये अक्षय कुमार होता. ‘जॉली एलएलबी ३’ मध्ये दोन्ही फ्रँचायझीतील प्रमुख कलाकार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या चित्रपटात सौरभ शुक्लादेखील न्यायाधीशाच्या लोकप्रिय भूमिकेत आहेत. हुमा कुरेशी, अमृता राव, गजराज राव आणि सीमा बिस्वास हे प्रमुख भूमिकेत आहेत.